महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ सप्टेंबर ।। उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. आता हुकूमशहा किम जोंग उन हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जगभरातील जवळपास डझनभर राष्ट्रप्रमुखांनी चीनच्या लष्करी परेडला हजेरी लावली आहे. यामध्ये किम जोंग उन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही सहभाग होता.
या दरम्यान किम जोंग उन यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय बैठकही घेतली. या बैठकीनंतरचा एक व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओची मोठी चर्चा रंगली आहे. किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतिन यांची द्विपक्षीय बैठक संपल्यानंतर उत्तर कोरियाच्या सुरक्षा रक्षकांनी किम जोंग उन यांनी स्पर्श केलेल्या प्रत्येक वस्तूची साफसफाई केल्याचं दिसून आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
The staff accompanying the North Korean leader meticulously erased all traces of Kim's presence.
They took the glass he drank from, wiped down the chair's upholstery, and cleaned the parts of the furniture the Korean leader had touched. pic.twitter.com/JOXVxg04Ym
— Russian Market (@runews) September 3, 2025
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, किम जोंग उन यांची बैठक संपताच उत्तर कोरियाचे दोन कर्मचारी किम जोंग उन यांनी स्पर्श केलेली प्रत्येक वस्तूची साफसफाई करताना दिसून आले. यामध्ये एका कर्मचाऱ्याने किम जोंग उन ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीचा मागचा भाग काळजीपूर्वक स्वच्छ केला. तसेच दुसऱ्याने पिण्याच्या पाण्याचा ग्लास एका ट्रेवर ठेवला आणि घेऊन गेला. तसेच खुर्चीसह टेबल, ग्लास यासह तेथील कोणत्याही वस्तूचा भाग स्वच्छ करायचं त्यांनी सोडलं नाही असं व्हिडीओत दिसून आलं आहे.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते किम जोंग उन हे बसलेल्या ठिकाणी त्यांचा डीएनए किंवा काही पुरावा राहू नये म्हणून त्यांच्या अंगरक्षकांनी खुर्ची आणि टेबलासह तेथील सर्व वस्तू स्वच्छ केल्या असाव्यात असा अंदाज लावला व्यक्त केला आहे.
उत्तर कोरियामधील लोकांच्या मोबाइलवर हुकूमशाहाचं नियंत्रण?
उत्तर कोरियामधील हुकूमशाह किम जोंग उन यांच्या करामती अनेकदा जगासमोर येत असतात. आताही किम जोंग उनचा असाच एक कारनामा काही दिवसांपूर्वी बीबीसी वृत्तसमूहाने समोर आणला. उत्तर कोरियामधील जनतेचे स्मार्टफोन आता सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत असल्याचे बीबीसीने पुराव्यासह दाखवले होते. यामुळे लोकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती प्राप्त करता येत नाही किंवा स्वतःच्या स्मार्टफोनचा खासगी वापर करता येत नाही. २०२४ च्या अखेरीस तस्करीद्वारे उत्तर कोरियातील स्मार्टफोन मिळवून त्याची तपासणी केली. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईडचे बदल केलेले व्हर्जन वापरले जाते. ज्याद्वारे फक्त स्थानिक इंटरनेटच फोनला जोडले जाऊ शकते. या इंटरनेटच्या माध्यमातून उत्तर कोरियाच्या सरकारला जी माहिती दाखवायची आहे, तीच वापरकर्त्याला पुरविली जाते. एवढेच नाही तर एखाद्याला फोनवर काही संदेश टाइप करायचा असेल तर सरकारला जी भाषा अपेक्षित आहे, ती आपोआप उमटली जाते.