महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ सप्टेंबर | परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळपासून चांगलाच वाढला. मुंबई, ठाणे, पनवेलसह पुणे, सातारा रायगड, बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाकडून मुंबईमध्ये पुढील चार ते पाच तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे घरात पाणी साचलेय. लोणी काळभोर परिसरात पावसाने रौद्ररूप घेतले. पुणे-सालापूर माहामार्ग लोणीमध्ये पाण्याखाली गेलाय. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील चार तास मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दादर, कुर्ला, प्रभादेवी, अंधेरीसह मुंबईत अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. तर रेल्वेही उशिराने धावत आहेत.
पुण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा –
पुण्यात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. सोमवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. १५ सप्टेंबर रोजी थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात १५० नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच पीएमआरडीए व NDRF टीमने बचाव करून सुमारे ५५ नागरिकांना सुरक्षित हलविले. पाणी ओसरत असून सकाळपर्यंत उर्वरित नागरिक घरी परततील. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण जन जीवन विस्कळीत झालेय. लोकांच्या घरात पाणी साचले आहे. पुणे-सोलापूर महामार्ग लोणीमध्ये पाण्याखाली गेला आहे.
आयएमडी मुंबईनुसार, पुणे, रायगड, अहमदनगर, बीड आणि लातूर येथे जोरदार वारे आणि गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, ’16 सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक/काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.’ तसेच, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.