राज्याला सतर्कतेचा इशारा, पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ सप्टेंबर | देशभरातून आता मान्सूनचे वारे परतीच्या वाटेवर लागले असले तरीही त्यांचा हा परतीचा प्रवास मात्र शांतपणे होणार नसून बऱ्याच भागांमध्ये ते धुमाकूळ घालतच परतणार असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय हवामान विभागानं वर्तवला आहे. आयएमडी अर्थात केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार दक्षिण भारतासह पूर्वोत्तर भारकतामध्ये दरम्यानच्या काळात अधिक पर्जन्यमानाचा अंदाज आहे. तर, मध्य भारतामध्ये वादळी पावसाचा इशारा आहे.

महाराष्ट्रात कुठे उसंत, कुठे थैमान…
इथं महाराष्ट्रात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरी वगळता बहुतांशी वरुणराजानं विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. ज्यामुळं पाऊस थांबला नाही, असं म्हणणं योग्य ठरेल. तर, पुढच्या 24 तासांसाठी कोकणापासून गोव्यापर्यंतच्या किनारपट्टी भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही वाऱ्याचा वेग वाढणार असून, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चार दिवसांहून अधिक काळापासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना पावसानं सातत्यानं झोडपल्यानं शेतं पाण्याखाली आली आहेत, तर, धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्या कारणानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
राज्यात ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, पुणे, (घाटमाथ्यावरील क्षेत्र), सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाऱ्याची दिशा बदलली तर हाहाकार?
हवामान तज्ज्ञ आणि निरीक्षकांच्या माहितीनुसार सध्या पॅसिफिक महासागरामध्ये तयार होणाऱ्या चक्रीवादळसदृश्य परिस्थितीमुळं बंगालच्या उपसागरापर्यंत परिणाम पाहायला मिळत आहेत. ‘रागासा’ या वादळी प्रणालीमुळंच पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली ही कमी दाबाची प्रणाली आणखी तीव्र होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्चतवण्यात येत आहे. ज्यामुळं जर हे वारं फिरलं तर, महाराष्ट्रात प्रामुख्यानं विदर्भात मोठं नुकसान होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *