India vs Bangladesh Asia Cup 2025 : भारताची अंतिम फेरी आजच निश्‍चित? आज बांगलादेशशी सामना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २४ सप्टेंबर | India face Bangladesh in the Asia Cup 2025 Super Four clash : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या आशियाई क्रिकेट करंडकात सलग चार सामन्यांमध्ये विजय संपादन करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ‘सुपर फोर’ फेरीमधील पहिल्या लढतीत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियाला बांगलादेशशी दोन हात करावयाचे आहेत. या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. याच कारणामुळे बांगलादेशविरुद्धची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

दोन देशांमधील अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंमधील द्वंद्व याप्रसंगी पाहायला मिळणार आहे. भारत आणि बांगलादेश लढतीला नेहमी एक वेगळी किनार असते. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, बांगलादेश संघाने २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले होते. बांगलादेशचा संघ आजही या विजयाची प्रेरणा घेऊन मैदानात उतरतो.

दुसरी गोष्ट म्हणजे खेळात सातत्य दिसत नसले, तरी बांगलादेशी खेळाडू नेहमी आपणच सर्वोत्तम अशा थाटात मैदानात उतरतात. भारताविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवायची वेगळीच खुमखुमी बांगलादेशी खेळाडूंना असते. या सर्वाचा विचार करता बुधवारच्या सामन्याला मजा येणार, हे नक्की आहे. अर्थातच सखोल तयारी करून भारतीय संघ जसे क्रिकेट खेळताना दिसतो आहे, त्याचा विचार करता सूर्यकुमार यादवच्या संघाचे पारडेच जड आहे. बुधवारचा सामना जिंका आणि अंतिम सामन्यातील जागा नक्की करा, भारतीय संघासाठी एकदम स्पष्ट संदेश आहे.

बांगलादेश संघाची मदार कर्णधार लिटन दास याच्या खांद्यावर असेल. त्याला जकीर अली आणि तौहीद हृदोयची साथ असेल. बांगलादेशचा अजून एक खेळाडू असा आहे जो भारतासमोर नेहमी चांगला खेळ करून दाखवतो. तो म्हणजे मेहदी हसन. ऑफस्पिन गोलंदाजीबरोबर मेहदी हसन नेहमी भरवशाची फलंदाजी मधल्या फळीत करतो. गोलंदाजीची धुरा मुस्तफिजूर रहमान आणि तस्कीन अहमदवर आहे.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करून चांगली धावसंख्या उभारण्याची तयारी दाखवली तरच भारतासमोर त्यांचा निभाव लागणार आहे. भारतीय संघ स्थिरावलेला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी संघात बदल होण्याची शक्यता दिसत नाही. जसप्रीत बुमराला आपल्या गोलंदाजीची लय सापडायला हवी, शिवाय उडालेले झेल पकडायला हवेत.

याच दोन गोष्टी सामना खेळताना सुधाराव्या लागतील. गेल्या दोन सामन्यांत थोड्या धावा करूनही संजू सॅमसन त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना बघायला मिळालेला नाही. जितेश शर्मासारखा चांगला खेळाडू बाहेर वाट बघत असताना संजू सॅमसनकडे त्याचे गुण दाखवायला जास्त वेळ उरलेला नाहीये.

सध्या चालू असलेल्या आशिया करंडक या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेला नाही. त्यातून भारत वि. बांगलादेश सामना कामाच्या दिवशी आहे. दिवसाचे पूर्ण काम करून लगेच गरम हवेत मैदानाचा रस्ता पार करून सामन्याला हजर राहण्याचा उत्साह प्रेक्षकांमध्ये किती प्रमाणात आहे हा संयोजकांना पडलेला प्रश्न आहे. एक नक्की आहे की भारताविरुद्धचा सामना म्हणल्यावर बांगलादेशी प्रेक्षक मैदानावर हजेरी लावायची शक्यता जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *