महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ सप्टेंबर | आपल्या ग्राहकांना चांगली सेवा मिळण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय आपल्या नियमांत वेळोवेळी सुधारणा करत असते. बॅंक खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यासंदर्भातील कार्यवाही होण्यास अनेक दिवसांचा कालावधी जायचा. पण आता खातेधारकाच्या नातेवाईकांना यासाठी ताण घेण्याची गरज लागणार नाहीय. कारण आरबीआयने यासंदर्भातील महत्वाचा निर्णय घेतलाय.
मृत ग्राहकांच्या दाव्यासंदर्भात निर्णय
रिझर्व्ह बँकेने (RBI) मृत ग्राहकांच्या बँक खात्यांशी, लॉकरशी किंवा ठेवींशी संबंधित दाव्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता बँकांना हे दावे 15 दिवसांच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे. यामुळे नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसांना पैसे किंवा वस्तू लवकर मिळतील. जर बँकेने उशीर केला, तर त्यांना भरपाई द्यावी लागणार असल्याचे आरबीआयने जाहीर केलंय.
नवीन नियमांचा उद्देश
मृत ग्राहकांच्या नातेवाइकांना त्यांचे हक्काचे पैसे किंवा वस्तू जलद आणि सुलभपणे मिळावेत. दाव्यांची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करणे, तसेच 15 दिवसांत निकाल लावणे हा यामागचा उद्देश आहे. जर बँक ही कार्यवाही करण्यास विलंब करत असेल तर नामनिर्देशित व्यक्तीला नुकसानभरपाई मिळेल, ज्याची रक्कम नंतर ठरेल,असे आरबीआयने म्हटलंय.
नियम कधी लागू होणार?
आरबीआयने सांगितले की, ‘भारतीय रिझर्व्ह बँक (मृत ग्राहकांच्या दाव्यांचे निपटारा) निर्देश, 2025’ लवकरात लवकर लागू होतील. बँकांना हे नियम 31 मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे लागू करावे लागतील. यामुळे दाव्यांचे निपटारे जलद होण्यास मदत होईल.
नामनिर्देशित व्यक्ती आणि मर्यादा
जर खातेदाराने नामनिर्देशित व्यक्ती निवडली असेल, तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर त्वरित रक्कम किंवा वस्तू मिळतील. जर नामनिर्देशन नसेल, तर सहकारी बँकांसाठी ₹5 लाख आणि इतर बँकांसाठी ₹15 लाखांपर्यंतच्या दाव्यांसाठी सोपी प्रक्रिया असेल. यापेक्षा जास्त रकमेच्या दाव्यांसाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र आवश्यक असेल.
कोणत्या खात्यांना नियम लागू?
हे नियम बचत खाते, मुदत ठेवी (एफडी), सेफ डिपॉझिट लॉकर आणि बँकेत ठेवलेल्या इतर वस्तूंना लागू होतील. आता कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर बँकेतील पैसे किंवा वस्तू मिळवण्यासाठी लांबलचक कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार नाही. ही प्रक्रिया जलद आणि सुलभ होईल, ज्यामुळे नातेवाइकांना दिलासा मिळेल.