महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर | मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाऱ्यासह पाऊस राहिला आहे. नवरात्र याच वातावरणात गेली. असं असताना आता दिवाळीवरही पावसाचं सावट आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या दरम्यान हवामान खात्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातच्या वादळाचा महाराष्ट्राला फटका बसणार आहे. चक्रीवादळ शक्ती गुजरात किनाऱ्याकडे सरकत आहे. पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा धोका… गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मोसमी वाऱ्यांचा प्रवास जैसे थे
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास मागील सात दिवसांपासून एकाच जागी आहे. मोसमी पावसाचा परतीचा प्रवास 14 सप्टेंबरपासून राजस्थानमधून सुरू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी गुजरात, राजस्थानच्या आणखी काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. त्यानंतर मागील सात दिवासांपासून मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला आहे.
पावसाला पोषक वातावरण
राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. इतर भागात पावसाची उघडीप राहील.मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत.
मात्र, मुसळधार पावलाची शक्यता नाही. दरम्यान, सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन – तीन दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त इतर भागात मात्र पावसाची फारशी शक्यता नाही. पावसाने उघडीप दिल्यामुळे पुन्हा एकदा उकाड्याची जाणीव सहन करावी लागत आहे. अनेक भागात तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपुढे नोंदला जात आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रात पुणे,सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूरसह अनके जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदा ऑक्टोबर हिट नसणार
यंदा ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे हा महिना तितकासा तापदायक नसेल. ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान 36 किंवा 37 अंश नोंदविण्यात येते. यावर्षी कमाल तापमान 32 ते 33 अंशांपर्यंत राहील. अशीच कमी-अधिक स्थिती राज्यभरात राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे हीटपासून सुटका होणार आहे.