महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २१ ऑक्टोबर | ॲमेझॉनच्या क्लाऊड सेवा विभागात (Amazon Web Services – AWS) सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील अनेक प्रमुख वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्स ठप्प झाले. जवळपास एक तास सेवांमध्ये व्यत्यय राहिल्यानंतर काही प्लॅटफॉर्म आता हळूहळू पूर्ववत होत आहेत.
ऑनलाइन सेवा ट्रॅक करणाऱ्या DownDetector या संकेतस्थळानुसार, ॲमेझॉनच्या क्लाऊड प्लॅटफॉर्म ‘AWS’ मध्ये झालेल्या बिघाडामुळे Robinhood, Snapchat आणि Perplexity AI यांसारख्या लोकप्रिय अॅप्सनी काम करणे थांबवले. जगातील इंटरनेट पायाभूत सुविधांमध्ये AWS चा मोठा वाटा असल्याने त्याचा परिणाम विस्तृत प्रमाणावर झाला.अमेरिकेत AWS साठी २,००० हून अधिक बिघाडांच्या नोंदी झाल्या असून, अनेक वापरकर्त्यांना डिजिटल सेवा आणि अॅप्समध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत असल्याचे DownDetectorने म्हटले आहे.ॲमेझॉनच्या स्वतःच्या सेवाही या बिघाडाच्या कक्षेबाहेर राहू शकल्या नाहीत. Amazon.com, Prime Video आणि Alexa या सेवांनाही कनेक्टिव्हिटी समस्या जाणवली.
Perplexity AI चे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी एक्स पोस्ट केली की, “ही समस्या AWS-संबंधित तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाली असून, आमची टीम ती दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”याशिवाय PayPal, Venmo यांसह इतर अनेक लोकप्रिय अॅप्स आणि वेबसाइट्समध्येही अधूनमधून सेवा खंडित झाल्याचे दिसून आले.
Perplexity is down right now. The root cause is an AWS issue. We’re working on resolving it.
— Aravind Srinivas (@AravSrinivas) October 20, 2025
डिलिव्हरी
प्रभावित प्लॅटफॉर्म्सची यादी
AWS सर्व्हरवर अवलंबून असलेल्या अनेक डिजिटल साधनांवर व अॅप्सवर या बिघाडाचा परिणाम झाला. यामध्ये कॅन्वा (Canva), कॅनव्हास (Canvas), क्रंचीरोळ (Crunchyroll), रोब्लॉक्स (Roblox), रेनबो सिक्स सीज (Rainbow Six Siege), कॉइनबेस (Coinbase), ड्युओलिंगो (Duolingo), गुडरीड्स (Goodreads), रिंग (Ring), फोर्टनाईट (Fortnite), ॲपल टीव्ही (Apple TV), व्हेरायझन (Verizon), चाइम (Chime), मॅकडोनाल्ड्स अॅप (the McDonald’s app) आणि पीयूबीजी बॅटलग्राउंड्स (PUBG Battlegrounds) यांचा समावेश आहे.
सोमवार दुपारपर्यंत काही सेवा पूर्वपदावर येऊ लागल्या असल्या, तरी सोशल मीडियावर वापरकर्त्यांकडून अजूनही अडचणींची नोंद होत आहे.ॲमेझॉनकडून मात्र या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण किंवा तो किती काळ सुरू राहिला याबाबत अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.