![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ नोव्हेंबर २०२५ | शहरातील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही येथील बहुतांश बेकरी व्यावसायिकांकडून लाकूड, कोळशाचा वापर सुरू आहे. संबंधित बेकरी व्यावसायिकांनी लाकूड, कोळशाऐवजी हरित इंधनाचा वापर पुढील दहा दिवसांत सुरू करावा, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने बेकरी व्यावसायिकांना दिला आहे.
प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या हद्दीतील बेकऱ्या, रेस्टॉरंटस्, ढाबा अशा ठिकाणी हरित इंधनाचा वापर सुरू करावा, असे आदेश महामंडळाने दिले आहेत. महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त रवी पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील बेकरी व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली.
शहरात ७५० तर उपनगरांमध्ये २५० बेकऱ्यांची संख्या आहे. या व्यवसायासाठी अजूनही लाकूड, कोळसा, तंदूरचा वापर केला जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे पवार यांनी व्यावसायिकांच्या निदर्शनास आणून दिले.
