![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ नोव्हेंबर २०२५ | : संयुक्त अरब अमिराती (यूएई) लष्कराच्या तीन वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), पुणे येथील ‘सशस्त्र सेना संगणकीय औषध केंद्र’ (एएफसीसीएम) आणि वैद्यकीय संशोधन विभागाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कर्नल सईद मोहम्मद अब्दुल्ला अलअर्दी अलनुआईमी यांनी केले. या वेळी ‘एएफएमसी’चे अधिष्ठाता व डेप्युटी कमांडंट मेजर जनरल अतुल सेठ यांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशिन लर्निंग (एमएल) या आधुनिक तंत्रज्ञानाचा आरोग्यसेवेत वापर, तसेच या क्षेत्रातील ‘एएफएमसी’च्या संशोधन कार्याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली, तसेच या संशोधन केंद्रातील अत्याधुनिक प्रकल्प आणि उपलब्ध सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांसाठी हँड्स-ऑन कोडिंगचे प्रात्यक्षिक सत्र आयोजित केले होते. या सत्रातून त्यांना आरोग्यसेवेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल अनुभव घेता आला.
संशोधन केंद्राची माहिती घेतल्यानंतर शिष्टमंडळाने एएफएमसी कॅम्पसचा दौरा केला. या वेळी शिष्टमंडळाने एएफएमसीचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव यांच्याशी सविस्तर संवाद साधला. या आंतरराष्ट्रीय भेटीमुळे भारत आणि यूएईच्या लष्करी वैद्यकीय संस्थांमधील सहकार्य वाढण्यास मदत होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
