महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड- नांदेड – दि. १० सप्टेंबर – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्हा कारागृहातील तब्बल ८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली असून,कारागृह अधीक्षकांनी या बातमीस दुजोरा दिला आहे .
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असून,शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. अशातच नांदेडच्या जिल्हा कारागृहात अॅन्टीजेन तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्हा कारागृहात तब्बल ८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे या तपासणीत पुढे आले आहे.यामुळे कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.दोन दिवसापासून ही तपासणी जिल्हा कारागृहात केली जात होती.
त्याचा एकत्रित अहवाल आज समोर आला. त्यात ८० कैदी आणि एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले.या सर्व कैद्यांचे कारागृहातच विलगीकरण कक्षात उपचार सुरु असून, कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी यास दुजोरा दिला आहे.सद्या कारागृहात २९१ कैदी असून,त्यांना वेगवेगळ्या बॅरेक मध्ये ठेवण्यात आले आहे.तर कोरोनाबाधीत कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे चांदणे यांनी सांगितले आहे.