महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ११ सप्टेंबर -डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत सरकारविरोधात संतात व्यक्त केला आहे. सरकार जबाबदारी घेत नसल्याने डॉक्टरांनी राज ठाकरेंची भेट घेत आपली व्यथा मांडली. राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रतिनिधी मंडळ त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. सहकारी डॉक्टराचा करोनाशी लढताना मृत्यू झाल्यानंतरही सरकराने विमा कवच नाकारल्याचं यावेळी डॉक्टरांनी सांगितलं.
एबीपी माझाशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, “जून महिन्यात आमच्या एका सहकाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाला. ते लॉकडाउनमध्ये सतत सेवा देत होते. आम्ही अर्ज केला असता तुमचा डॉक्टर प्रायव्हेड प्रॅक्टिशनर असल्याने विमा देता येणार नाही असं सांगण्यात आलं. तुम्ही स्वत:च्या खासगी दवाखान्यात काम करत होता आणि याचा कोविडशी काही संबंध नाही असं नाकारलेल्या अर्जात नमूद करण्यात आलं आहे. हे फार निर्दयी प्रकारचं स्टेटमेंट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलो आहोत”.
मनसे नेते संदीप देशपांडेही यावेळी उपस्थित होते. “कोविड योद्धे म्हणून आपण ज्यांच्यासाठी थाळ्या वाजवल्या, विमानातून पुष्पवृष्टी केली…त्यांना जर अशी वागणूक मिळणार असेल तर मग त्याला काही अर्थ उरत नाही. राज्य सरकार कशात व्यस्त आहे हे सर्वांना माहिती आहे. करोनाशी लढतोय म्हणायचं आणि लोकांना भलत्या गोष्टीत व्यस्त करायचं आणि गंभीर विषयाकडे लक्ष द्यायचं नाही. ही सरकारची दुटप्पी भूमिका असून सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.