✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ५ डिसेंबर २०२५ | मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत समीक्षा बैठक घेतली असून येत्या सोमवारी अंतिम आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम कुठल्याही क्षणी जाहीर होईल, अशी राजकीय गलियार्यात चर्चा रंगली आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी बहुतांश महापालिका मतदार यादीतील दुबार नोंदी शोधण्यात, सुधारण्यामध्ये आणि अंतिम याद्या तयार करण्यात वेगाने कार्यरत आहेत. १० डिसेंबरची निवडणूक आयोगाने दिलेली डेडलाईन डोक्यावर असून अनेक महानगरपालिकांनी कामाचा वेग दुप्पट केला आहे. मतदार यादीतील डुप्लिकेट नावे शोधून काढणे, त्यांना चिन्हांकित करणे, आणि अंतिम यादी प्रकाशनाची तयारी पूर्ण करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने मात्र काही दिवसांची अतिरिक्त मुदत मागितली आहे. कारण आयोगाकडून उपलब्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे नसल्यामुळे एकाच नावाची अनेक नोंदी असलेल्या मतदारांची पडताळणी अधिक गुंतागुंतीची ठरत आहे. त्यामुळे काही ठिकाणी समान नावांमुळे चुकून ‘डुप्लिकेट’ ठप्पा बसल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार उपलब्ध यादीमुळे पडताळणीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा संथ चालल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूत्रांची खात्री— BMC निवडणूक जानेवारीच्या मध्यात आणि जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका जानेवारीच्या अखेरीस होण्याची शक्यता प्रबळ आहे. १५ डिसेंबरनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि १५ ते १८ जानेवारीदरम्यान मतदानाची शक्यता व्यक्त केली जात आहे. “मतदार यादीतील विसंगती न्यूनतम ठेवाव्या; अन्यथा विरोधकांकडून अनावश्यक आरोपांना तोंड द्यावे लागू शकते”— अशा कडक सूचना आयोगाने सर्व महानगरपालिकांना दिल्या आहेत.
