✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | नागपूर अधिवेशन-चिखलीतील JNNURM घरकुलांच्या रहिवाशांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत गरजणारा आवाज उमटला, आणि तो म्हणजे भाजपा आमदार महेश लांडगे यांचा. 36.77 चौ. मीटरच्या छोट्याशा घरात गरीब कुटुंबं जगण्याची तारेवरची कसरत करत असताना, महानगरपालिकेचा ‘प्रॉपर्टी टॅक्स’ हा त्यांच्या मानगुटीवर बसलेला अनाठायी बोजाच आहे, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सभागृहात दिला.
“मुंबई महानगरपालिका अधिनियम स्पष्ट सांगतो—500 चौ. फुटांच्या घरांवर कर नाही. मग चिखलीतील या वसाहतींना न्याय का मिळू नये?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. रोजंदारीवर कुटुंब पोटभरत असताना ‘कर’ नावाचा शब्दसुद्धा ताण वाढवतो, याची आठवण करून देत लांडगे यांनी करमाफीची मागणी ठामपणे मांडली.
दर वर्षी पावसात पाणी शिरते, Structurally कमकुवत बांधकामांमुळे अनेक समस्या निर्माण होतात; आणि त्यातही ‘प्रॉपर्टी टॅक्स’ भरण्याचा आदेश? “ही घरे उभी करतानाच भौगोलिक स्थितीचा विचार झाला नाही, आणि त्याची शिक्षा आता हजारो घरकूलवासीयांना मिळते आहे,” असा आरोपही त्यांनी सभागृहात नोंदवला.
“JNNURM–PMAY योजनांचा उद्देश गरीबांना ‘घर’ देणे हा आहे, ‘भार’ देणे नव्हे. चिखली घरकूलवासीयांना न्याय मिळायलाच हवा. करमाफी हा सरकारचा अनुदारपणा नसून कर्तव्य आहे,” असा सरकारला स्पष्ट संदेश त्यांनी दिला. लांडगे यांच्या या मागणीनंतर राज्यभरातील JNNURM व PMAY लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
