आयुर्वेद उपचारातून थेट जीवनशैलीकडे; ‘निर्विकार आरोग्य दिनदर्शिका’ ठरतेय जनतेचा आरोग्यमंत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | दिनांक 15 डिसेंबर| आयुर्वेद जन-जनासाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी हा केवळ नारा न राहता कृतीत उतरवणारा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने भोसरीतील ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’ येथे उत्साहात पार पडला. CGHS, ECHS, केंद्रीय कर्मचारी तसेच सर्व विमा कंपन्यांसाठी कॅशलेस उपचार देणारे महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या या संस्थेतून गेल्या सात वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘निर्विकार आरोग्य दिनदर्शिका’ या उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

वैद्य निलेश लोंढे व वैद्या सारिका लोंढे यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा उपक्रम समाजात आयुर्वेदिक जीवनशैली रुजवण्याचे काम करीत आहे. आदरणीय गुरुवैद्य प्रा. शि. पवार सर आणि वैद्य संतोष सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामागे “ज्ञान आचरणात उतरले तरच ते समाजोपयोगी ठरते” हे स्पष्ट तत्त्वज्ञान आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ आजारावर उपचार नव्हे, तर दैनंदिन जीवनात सहज अमलात आणता येणारी शास्त्रीय जीवनपद्धती आहे, हा ठाम संदेश या दिनदर्शिकेतून दिला जात आहे.

‘निर्विकार आरोग्य दिनदर्शिका’मध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, सुवर्णप्राशन, आजीबाईचा बटवा, सण-उत्सव व आयुर्वेद, उपवास, त्रिदोषानुसार आहार-विहार, आयुर्वेदिक पाककृती, प्रकृती परीक्षण, पंचकर्म, फॅमिली हेल्थ टार्गेट, नक्षत्रवन, प्रतिकारक्षमता परीक्षण, योग, आरोग्य शिबिरे, अभ्यंग महोत्सव तसेच मुलांसाठी खेळ व कोडी असे तब्बल १८ अभ्यासपूर्ण व उपयुक्त आयुर्वेदिक अध्याय समाविष्ट आहेत. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत संपूर्ण कुटुंबासाठी ही दिनदर्शिका मार्गदर्शक ठरत आहे.

या कार्यक्रमास CGHS Beneficiary Welfare Association चे श्री ठाकूर, श्री मेनन, श्री सोमनाथन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय वैद्य संतोष सूर्यवंशी, श्री सचिनभैय्या लांडगे, पत्रकार वंदना कोर्टीकर, पर्यावरणप्रेमी राजीव भावसार, गुरुवैद्य प्रा. शि. पवार, आर्मसिद्ध भिसे सर, पर्यावरणप्रेमी भास्कर रिकामे तसेच वैद्य निलेश लोंढे व वैद्या सारिका लोंढे यांची मान्यवर उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आयुर्वेदाचा स्वीकार दैनंदिन जीवनात केल्यास वैयक्तिक आरोग्यासोबतच समाज व पर्यावरणाचे आरोग्यही सुदृढ होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ‘निर्विकार आरोग्य दिनदर्शिका’ हा उपक्रम आयुर्वेदाला घराघरांत पोहोचवणारा प्रभावी सेतू ठरत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक व सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *