![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १८ डिसेंबर २०२५ | डिसेंबर महिन्याचे पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. नोव्हेंबरनंतर आता डिसेंबर महिन्याचाही हप्ता रखडल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पैसे नेमके कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचसोबत जानेवारी महिन्याचा हप्तादेखील याच कालावधीत देण्यात येऊन तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळू शकतात, अशी चर्चा सुरु आहे.
लाडकी बहीण योजनेत ₹४५०० मिळणार?
लाडकी बहीण योजनेत दरमहा ₹१५०० दिले जातात. जर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्ही हप्ते एकत्र दिले गेले, तर लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण ₹४५०० जमा होण्याची शक्यता आहे. कदाचित हे सर्व हप्ते जानेवारी महिन्यातच दिले जाऊ शकतात.मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हप्ते उशिरा मिळण्यामागील कारण काय?
लाडकी बहीण योजनेतील निधी उशिरा मिळण्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने या कालावधीत निधी वितरण थांबवण्यात आल्याची माहिती आहे.
निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आणि निधी मंजूर झाल्यावर महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
