![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १८ डिसेंबर २०२५ | जगभरातील सुमारे २५ विमान कंपन्या मुंबई विमानतळावरून कार्गो वाहतूक करतात. दरवर्षी सुमारे ५ लाख मेट्रिक टन मालाची आयात-निर्यात मुंबई विमानतळावरून होते. यामध्ये दरमहा सुमारे १७ हजार मेट्रिक टन निर्यात आणि २३ हजार मेट्रिक टन आयात होते. या मोठ्या प्रमाणातील मालवाहतुकीचा थेट परिणाम मुंबईतील वाहतूक कोंडीवर होत आहे.
कार्गो वाहतूक मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई विमानतळावर (NMIA) स्थलांतरित केल्यास, इतर राज्यांमध्ये माल पोहोचवणे अधिक सुलभ होईल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होऊन, प्रवासी विमानांसाठी अधिक वेळा उपलब्ध होऊ शकतील.
मुंबई विमानतळावर क्षमतेचा ताण
मुंबई विमानतळाने २४ तासांत १०३३ विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम नोंदवला आहे. यासंदर्भात कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले की, मुंबई विमानतळावर दररोज सुमारे ९५० विमाने ये-जा करतात. यामध्ये २५ कार्गो विमाने, तर सुमारे २५ विमाने प्रवासी व कार्गो दोन्ही प्रकारची वाहतूक करतात. याशिवाय दररोज किमान २५ खासगी विमाने मुंबई विमानतळावर ये-जा करतात.
जर ही २५ कार्गो विमाने नवी मुंबई विमानतळावरून कार्यरत झाली, तर तेवढ्या वेळा मुंबई विमानतळावर प्रवासी विमानांसाठी उपलब्ध होतील, असा तर्कही जाधव यांनी मांडला. मात्र, कार्गो विमानांच्या अचूक संख्येबाबत मुंबई विमानतळ प्रशासनाकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
क्रॉस रनवेची मर्यादा
मुंबई विमानतळावर दोन रनवे असले तरी ते क्रॉस रनवे असल्याने एकावेळी एकच विमान उतरणे किंवा उड्डाण करणे शक्य होते. त्यामुळे कार्गो विमानांच्या हाताळणीवर मर्यादा येतात.
दिल्ली विमानतळावर सरळ रेषेत चार रनवे असून, तेथे २४ तासांत १५०० विमानांची वाहतूक झाली आहे. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर कार्गो वाहतुकीसाठी अधिक वेळा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शेतमाल व फार्मा उद्योगाला मोठा दिलासा
नवी मुंबई विमानतळावरून कार्गो वाहतूक सुरू झाल्यास शेतमाल आणि फार्मास्युटिकल उद्योगाला मोठा फायदा होईल. मुंबईतील कार्गो वाहतूक मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईत शिफ्ट करून, मुंबई विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला केल्यास, दोन्ही बाजूंना फायदा होऊ शकतो.
या कार्गो वाहतुकीचा लाभ पुणे, नाशिक, रायगड, तसेच ठाणे–बेलापूर औद्योगिक वसाहत, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांना होणार आहे. नवी मुंबईतील एपीएमसीची वार्षिक उलाढाल १० ते १२ हजार कोटी रुपये असून, त्यातून सरकारला सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
‘एनएमआयए’वरून कार्गो वाहतूक सुरू झाल्यास आंबे, द्राक्षे आणि कांदा यांसारख्या शेतमालाला सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच जेएनपीए बंदर जवळ असल्याने तेथील मालही विमानमार्गे देशभर पाठवणे सुलभ होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे.
कार्गो वाहतूक करणाऱ्या प्रमुख विमान कंपन्या
ब्लू डार्ट, एरो लॉजिक, चॅलेंज एअर कार्गो, सिल्क वे वेस्ट एअरलाइन्स, एअर फ्रान्स, चायना एअरलाइन्स, कॅथे पॅसिफिक, इथिओपियन एअरलाइन्स, फेडएक्स, लुफ्थान्सा, कतार एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्स, टर्किश एअरलाइन्स, ओमान एअर, मलेशिया एअरलाइन्स, एअर मॉरिशस, एअर टांझानिया, इंडिगो कार्गो, केनिया एअरवेज, यूपीएस, केएलएम, एमिरेट्स, सौदिया एअरलाइन्स, एतिहाद एअरलाइन्स.
