![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १९ डिसेंबर २०२५ | वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे रखडलेली कामे, आर्थिक हिशेब-किताब आणि नववर्षापूर्वीची धावपळ. पण याच काळात जर बँकांनाच सलग पाच दिवस कुलूप लागणार असेल, तर अनेकांचा गोंधळ उडणे साहजिकच आहे. डिसेंबर महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे बँकांना सलग सुट्ट्या जाहीर झाल्या असून, १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत अनेक ठिकाणी बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत.
१८ डिसेंबर रोजी मेघालय आणि छत्तीसगडमध्ये स्थानिक कारणांमुळे बँका बंद होत्या. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ डिसेंबरला गोवा स्वातंत्र्य दिनानिमित्त गोव्यातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली. २० डिसेंबर रोजी सिक्कीममध्ये लोसूंग आणि नामसूंग या पारंपरिक सणांमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर २१ डिसेंबरला रविवार असल्याने देशभरातील सर्वच बँकांना नेहमीप्रमाणे सुट्टी आहे. २२ डिसेंबरला पुन्हा एकदा सिक्कीममध्ये त्याच सणांमुळे बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. अशा प्रकारे काही राज्यांमध्ये सलग पाच दिवस बँकांचे व्यवहार होणार नाहीत.
याचा थेट फटका मात्र सामान्य ग्राहकांना बसू शकतो. चेक क्लिअरन्स, कर्जाशी संबंधित कागदपत्रे, ड्राफ्ट, काउंटरवर करावयाची कामे किंवा खात्याशी निगडित तातडीची कामे या कालावधीत रखडण्याची शक्यता आहे. विशेषतः वर्षअखेरीस आर्थिक व्यवहार जास्त असल्याने अनेक जणांना बँक बंद असल्याचे कळल्यावर ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागतो.
यातच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही सुट्ट्यांची रांग लागलेली आहे. महाराष्ट्रात २१, २५ (ख्रिसमस), २७ आणि २८ डिसेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर बँकिंग कामे करायची असतील, तर नियोजन आधीच करणे गरजेचे आहे.
दिलासादायक बाब म्हणजे बँकांना सुट्टी असली तरी डिजिटल सेवा मात्र सुरू राहणार आहेत. इंटरनेट बँकिंग, मोबाईल अॅप्स, यूपीआय, एटीएम, तसेच एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहार सुरूच असतील. म्हणजेच बँकेच्या शाखा बंद असल्या, तरी मोबाईल आणि ऑनलाइन व्यवहारांचा पर्याय खुला आहे.
एकूणच, डिसेंबरमध्ये बँकांच्या सुट्ट्यांचा सापळा ओळखूनच आर्थिक कामांची आखणी केली, तर नववर्षात अडचणी टाळता येतील—नाहीतर “बँक बंद आहे” हे वाक्य पुन्हा एकदा कानावर पडण्याची शक्यता नक्की!
