बांगलादेश पेटला! युवा नेते हादी यांच्या मृत्यूनंतर ढाक्यात जाळपोळ, सरकारपुढे मोठे आव्हान

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १९ डिसेंबर २०२५ | बांगलादेशात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेचे ढग दाटले असून युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘इन्कलाब मंच’चे प्रभावी युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या हादी यांच्या निधनाने समर्थक संतप्त झाले असून राजधानी ढाकासह अनेक भागांत आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे.

१२ डिसेंबर रोजी ढाकामध्ये प्रचारादरम्यान अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात शरीफ उस्मान हादी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच बांगलादेशभर संतापाची लाट उसळली. हादी हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनात सक्रिय होते आणि तरुणांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता.

हादी यांच्या मृत्यूनंतर ‘इन्कलाब मंच’ने ढाकामधील शाहाबाग परिसरात जमण्याचे आवाहन केले. हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. सुरुवातीला शांत असलेले आंदोलन काही वेळातच उग्र बनले. अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले, वाहनांची तोडफोड झाली आणि घोषणाबाजी करण्यात आली. ढाका विद्यापीठातील ‘जातीया छात्र शक्ती’ या विद्यार्थी संघटनेने शोकयात्रा काढत हादी यांच्या हत्येचा तीव्र निषेध केला.

दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. गृह खात्याचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या घराला आंदोलकांनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. याशिवाय देशातील प्रसिद्ध ‘प्रोथोम अलो’ या वृत्तपत्राच्या कार्यालयालाही लक्ष्य करण्यात आले. कार्यालयाला आग लावण्यात आली असताना आत पत्रकार व नागरिक अडकल्याची माहिती समोर आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. आंदोलकांनी आवामी लिग आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी हादी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, त्यांनी आंदोलकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहनही केले आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता ढाका आणि इतर संवेदनशील भागांत लष्कर व पॅरामिलिटरी दल तैनात करण्यात आले आहे. तरीही बांगलादेशातील तणावपूर्ण वातावरण सरकारसाठी मोठे आव्हान ठरत असून, हादी यांच्या मृत्यूमुळे पेटलेली ही ठिणगी देशाला कुठे घेऊन जाईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *