चिकन-मटणालाही नकार! नागाव-आक्षीत बिबट्याचा ‘मिस्ट्री मूड’, वनखाते हैराण; ग्रामस्थांमध्ये दहशत कायम

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १९ डिसेंबर २०२५ | तो आला… आठ जणांवर हल्ले करून गायब झाला… त्याला पकडण्यासाठी दिवस-रात्र एक केली… झाडीझुडपे पालथी घातली… पाच पिंजरे, कोंबड्या, मटणाची ‘डिनर पार्टी’ही सजली… पण दहा दिवस उलटून गेले तरी पठ्या काही हाती लागेना! नागाव-आक्षी परिसरात सध्या हाच प्रश्न चर्चेत आहे — तो नेमका गेला कुठे?

अलिबागजवळील निसर्गरम्य नागावमधील वाळंज पारोडा, खालची आळी परिसरात ९ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास बिबट्याने भरवस्तीत प्रवेश केला आणि एकच खळबळ उडाली. अवघ्या काही तासांत सहा जणांवर हल्ला करत त्याने परिसरात दहशत निर्माण केली. नागरिक घाबरून घरात कोंडले गेले, तर वनविभागाच्या रेस्क्यू टीम तातडीने दाखल झाल्या.

अलिबाग, रोहा आणि पुणे वनविभागाच्या पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. मात्र बिबट्या नजरेस न पडल्याने दोन दिवसांनी रेस्क्यू टीम परत गेल्या. ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकतो न तोच १२ डिसेंबर रोजी नागावलगतच्या आक्षी गावातील साखर परिसरात बिबट्याने पुन्हा हजेरी लावली. यावेळी दोन जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याने भीती पुन्हा वाढली.

यानंतर वनविभागाने कंबर कसली. आक्षी-साखर परिसरात तब्बल पाच ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. कोंबड्या, मटण ठेवून बिबट्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र चिकन-मटणालाही बिबट्याने दाद दिली नाही! पिंजऱ्याजवळ फिरकूनही तो आत गेला नाही. परिणामी वनखात्याचे कर्मचारीही हतबल झाले आहेत.

दरम्यान, हा बिबट्या मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातून आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र घनदाट जंगलातून थेट समुद्रकिनारी व मानवी वस्तीत तो कसा पोहोचला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. बिबट्याचा नेमका मार्ग, हालचाली आणि सध्याचे ठिकाण याबाबत कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही.

एका बाजूला बिबट्याचा शोध सुरू असताना दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. रात्री बाहेर पडणे बंद, शाळकरी मुलांची काळजी, शेतकामावर परिणाम — दहशतीचा हा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे. बिबट्या हाती लागेपर्यंत नागाव-आक्षी परिसरातील ही भीती कायम राहणार, हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *