✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १९ डिसेंबर २०२५ | ॲडलेड : ॲडलेड येथे सुरू असलेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ॲशेस कसोटीत ‘डीआरएस’वरून शंका उपस्थित होत आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी ॲलेक्स कॅरी ७२ धावांवर असताना ‘डीआरएस’चा अवलंब करण्यात आला व त्याला नाबाद ठरवण्यात आले.
इंग्लंडच्या खेळाडूंनी या वेळी नाराजी व्यक्त केली. चेंडू त्याच्या बॅटला लागून गेल्यानंतरही तो नाबाद ठरवण्यात आला. अखेर त्याने शतक झळकावले. आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथच्या बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीकडे गेला, असे वाटू लागले.
मैदानातील पंचांकडून त्याला बादही घोषित करण्यात आले; मात्र इंग्लंडकडून ‘डीआरएस’ मागितल्यानंतर चेंडू बॅटच्या बाजूने गेल्यावर एक अनिश्चित उसळी आल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. याचा अर्थ त्याच्या बॅटला चेंडू लागला की नाही, हे निश्चित कळत नव्हते. तरीही त्याला बाद देण्यात आले. ॲडलेड कसोटीतील या घटनांमुळे ‘डीआरएस’वरील निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ॲडलेड कसोटीत ‘डीआरएस’चा मुद्दा ऐरणीवर असताना मात्र ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उस्मान ख्वाजा (८२ धावा), ॲलेक्स कॅरी (१०६ धावा) व मिचेल स्टार्क (५४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ३७१ धावा फटकावल्या. त्यानंतर पुनरागमन करणाऱ्या कर्णधार पॅट कमिंस याने प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची पहिल्या डावात आठ बाद २१३ धावा, अशी बिकट अवस्था केली आहे.
दरम्यान, ऑफस्पिनर नॅथन लायन याने आज ग्लेन मॅग्राच्या सर्वाधिक कसोटी विकेटना लीलया मागे टाकले. ग्लेन मॅग्रा याने ५६३ फलंदाज बाद केले होते. नॅथन लायन याने आतापर्यंत ५६४ फलंदाज बाद केले आहेत. कसोटीत सर्वाधिक फलंदाज बाद करणारा तो आता शेन वॉर्न याच्यानंतर दुसराच गोलंदाज ठरला आहे.
स्टार फलंदाज पुन्हा ढेपाळले
इंग्लंडचे स्टार फलंदाज पर्थ, ब्रिस्बेननंतर ॲडलेड कसोटीत पुन्हा एकदा ढेपाळले. झॅक क्रॉली (९ धावा), बेन डकेट (२९ धावा), ओली पोल (३ धावा), ज्यो रुट (१९ धावा), जेमी स्मिथ (२२ धावा) व विल जॅक्स (६ धावा) यांच्याकडून निराशा झाली.
