सोने-चांदी दराला कोणीतरी आवरा! सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात गुंतवणूकदार, भावांनी मोडले सर्व विक्रम

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १९ डिसेंबर २०२५ | “भाव थांबतील कुठे?” असा प्रश्न आता सर्वसामान्य ग्राहकांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनाच पडला आहे. मागील दोन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ आता विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, घसरलेला रुपया आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेने केलेली व्याजदर कपात यामुळे मौल्यवान धातूंचे भाव अक्षरशः उसळी घेत आहेत.

चांदीने तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. गुरुवारी चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठत प्रति किलो २ लाख १ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार केला. काही बाजारांत चांदीचा दर थेट २ लाख ११ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचेही चित्र आहे. नोव्हेंबरमध्ये काहीशी स्थिरता जाणवत होती, मात्र डिसेंबरमध्ये जागतिक घडामोडींचा थेट परिणाम बाजारावर दिसू लागला आहे. त्यामुळे चांदीच्या दराने अक्षरशः ‘धूम’ केली आहे.

चांदीसोबत सोन्यानेही नवा उच्चांक गाठला आहे. अवघ्या २४ तासांत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल पुन्हा वाढत असून, देशांतर्गत मागणीही जोर धरताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस ४,३२५.०२ डॉलर्सवर स्थिरावली आहे.

विश्लेषकांच्या मते, चांदीच्या दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. चीनमधील चांदीचा साठा गेल्या दशकातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला असून, याच वर्षात चांदीच्या किमती तब्बल १२६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सलग पाचव्या वर्षी चांदीच्या पुरवठ्यात कमतरता जाणवत असल्याने ही तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी, औद्योगिक वापरातील वाढ, चांदीच्या ईटीएफमध्ये वाढलेली गुंतवणूक आणि फेडरल रिझर्व्हकडून आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा यामुळे दरांना बळ मिळत आहे. २०२६ पासून चीन चांदीच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याच्या वृत्तांमुळे जागतिक बाजारावर आणखी दबाव येऊ शकतो.

दरम्यान, भारतातील प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर दिल्ली, जयपूर, लखनौ, चंदीगड येथे १,३५,००० रुपये, तर मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद येथे सुमारे १,३४,८५० रुपयांवर पोहोचला आहे. एकूणच, सोनं-चांदीचे भाव पाहता “आता तरी आवरा” अशीच हाक ग्राहक आणि गुंतवणूकदारांकडून ऐकू येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *