![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १९ डिसेंबर २०२५ | “गाडी मिळत नाही” ही तक्रार ऐकू येऊ नये, यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षभरात अक्षरशः धडाकेबाज नियोजन केल्याचे चित्र समोर आले आहे. वाढती प्रवासी संख्या, सण-उत्सवांची गर्दी आणि सुट्ट्यांमधील प्रवासाची गरज लक्षात घेत पुण्याहून तब्बल ९६ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांच्या माध्यमातून ९६४ विशेष फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या असून, त्यातून दोन लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे. परिणामी, पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०२५ हे वर्ष पुणे रेल्वे विभागासाठी ‘स्पेशल’ ठरले, असेच म्हणावे लागेल. उत्तर भारत, मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटककडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना, नेमक्या गर्दीच्या मार्गांवर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्याचा थेट फायदा सामान्य प्रवाशांना झाला. पुणे ते दानापूर या मार्गावर सर्वाधिक म्हणजेच ६७ विशेष फेऱ्या झाल्या. उत्तर भारतातील प्रवाशांचा ओघ लक्षात घेता दानापूर, गोरखपूर, निजामुद्दीन हे मार्ग रेल्वेच्या प्राधान्यक्रमावर होते.
दानापूरनंतर पुणे–गोरखपूर मार्गावर ६५ फेऱ्या, तर दौंड–कलबुर्गी मार्गावर ६४ फेऱ्या धावल्या. याशिवाय कोल्हापूर–कलबुर्गी (४९ फेऱ्या) आणि हडपसर–लातूर (३७ फेऱ्या) या मार्गांवरही विशेष गाड्यांची मोठी मदत झाली. या गाड्यांमुळे मराठवाडा व कर्नाटककडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर झाला.
सण-उत्सवांच्या काळात तर रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष दिले. दिवाळीत ३० हून अधिक फेऱ्या सोडून दानापूर, गोरखपूर आणि निजामुद्दीनकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आली. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तब्बल २४० हून अधिक विशेष फेऱ्या धावल्या, ज्यात नागपूर, इंदूर, दानापूर आणि कलबुर्गी हे प्रमुख मार्ग होते. आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ३४ विशेष फेऱ्या, तर गणपती उत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी रत्नागिरी मार्गावर ६ विशेष फेऱ्या सोडण्यात आल्या.
“प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हाच आमचा मुख्य उद्देश होता,” असे पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी स्पष्ट केले. एकूणच, विशेष रेल्वेगाड्यांच्या या ‘स्पेशल’ नियोजनामुळे पुण्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर झाला, असेच म्हणावे लागेल.
