Budget 2026: सिंहस्थाच्या उंबरठ्यावर नाशिकचा कुंभ पुन्हा रिताच! ना निधी, ना कॉरिडोर; जुन्या स्वप्नांनाही ठेंगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २ फेब्रुवारी २०२६ | सिंहस्थ कुंभमेळ्याला अवघा एक वर्ष शिल्लक असताना, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये नाशिकचा कुंभ पुन्हा एकदा कोरडाच राहिला. प्रयागराजच्या धर्तीवर विशेष निधी, धार्मिक कॉरिडोर किंवा पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या नाशिककरांच्या पदरी यंदाही निराशाच पडली आहे.

निओ मेट्रो, नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे, कृषी टर्मिनल, रेल्वे ट्रॅक्शन कारखाना, रेलनीर प्रकल्प, ड्रायपोर्ट, सिपेक, नायपर—या गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या प्रकल्पांचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. “मंदिरांच्या शहरांसाठी ५ हजार कोटी” आणि “म्युनिसिपल बाँडसाठी प्रोत्साहन” अशा घोषणा कागदावर दिसतात, मात्र त्यात नाशिकच्या वाट्याला नेमकं काय, याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.

अपेक्षा मोठ्या, पदरी मात्र रिकामेपण

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वरसाठी विशेष पॅकेज जाहीर होईल, अशी अपेक्षा प्रशासनासह उत्तर महाराष्ट्रातील जनतेला होती. नाशिकच्या यंत्रणांनी तब्बल २४ हजार कोटींचा विकास आराखडा सादर केला आहे. प्रत्यक्षात मात्र सिंहस्थाचा अर्थसंकल्पात उल्लेखही नाही, ही बाब अनेकांना धक्का देणारी ठरली आहे.

पुणे-मुंबईला वेग, नाशिकला प्रतीक्षा

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रलंबित असतानाच मुंबई–पुणे हायस्पीड कॉरिडोरची घोषणा करण्यात आली. तीन दशकांपासून रखडलेल्या मनमाड–इंदूर रेल्वेमार्गालाही गती मिळाली नाही. सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाच्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या विस्तारासाठीही केंद्राकडून अपेक्षित निधी मिळालेला नाही.

इच्छाशक्तीचा अभाव?

मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी कोट्यवधींच्या घोषणा होत असताना, नाशिक मात्र प्रत्येक अर्थसंकल्पात मागेच पडत असल्याचं चित्र आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचा इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरील उदासीनता यामुळे नाशिकची पीछेहाट अधिक ठळकपणे जाणवते.

या प्रमुख प्रकल्पांना पुन्हा ठेंगा

₹2,780 कोटींचा नमामि गोदा प्रकल्प

डिफेन्स इनोव्हेशन हब

नाशिकरोड कृषी टर्मिनल

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे

मनमाड–इंदूर रेल्वेमार्ग

नाशिकरोड रेल्वे ट्रॅक्शन कारखाना

निओ मेट्रो प्रकल्प

रेलनीर प्रकल्प, ड्रायपोर्ट, सिपेक, नायपर

द्वारका–नाशिकरोड डबलडेकर उड्डाणपूल

आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, लॉजिस्टिक व आयटी पार्क

👉 थोडक्यात काय?
कुंभ दारात उभा आहे, पण अर्थसंकल्पात नाशिकला अजूनही प्रतीक्षेचीच प्रसादपत्री दिली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *