![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २ फेब्रुवारी २०२६ |सराफा बाजार म्हणजे सध्या नाटकगृहच. कालपर्यंत पडद्यावर नाचणारी ‘सुवर्णनायिका’ आज थेट ग्रीनरूममध्ये कोसळलेली, तर चांदीचा थाटमाट तर असा की “मीच राजा” म्हणणारी रुपेरी राणी आज जमिनीवर बसून मोजणी करतेय. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी बाजारात असा ‘सेल-ऑफ’ झाला की गुंतवणूकदारांना कॅल्क्युलेटरपेक्षा देवाची आठवण जास्त झाली. MCX वर सोने दोन टक्क्यांहून अधिक घसरलं, चांदीने तर तीन टक्क्यांची उडी थेट खालीच मारली. कालपर्यंत “सोने म्हणजे सुरक्षितता” असं ठासून सांगणारे आज “दीर्घकालीन दृष्टी ठेवा” असा सल्ला देताना दिसतात. म्हणजे काल जे सत्य होतं ते आज तत्त्वज्ञान झालं! या घसरणीमागे कारणं सांगताना अर्थतज्ज्ञ इतकी अवघड भाषा वापरतात की सामान्य गुंतवणूकदाराला वाटतं—दर घसरले नसते तर बरे झाले असते!
CME च्या मार्जिनमध्ये वाढ, जागतिक संकेत, नफा बुकिंग… या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच—मोठे खेळाडू निघून गेले, छोटे मात्र तिकीट काढून बसले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड एका झटक्यात घसरलं, चांदीने आधी उसळी मारली आणि मग धप्पकन आपटली. अमेरिकेतील राजकीय घोषणांचा, फेडच्या स्वातंत्र्याचा, डॉलरच्या ताकदीचा परिणाम थेट आपल्या अंगठी आणि वाटीतल्या चांदीवर होतो, हे पाहून “जग खूपच लहान आहे” याची पुन्हा जाणीव झाली. जागतिक बाजारात जेव्हा खोकला येतो, तेव्हा आपल्या सराफाला ताप चढतो! पण या सगळ्यात धडा काय?
गेल्या वर्षभरात सोन्या-चांदीने जे विक्रम मोडले, ते पाहून अनुभवी लोकही मोहात पडले. भू-राजकीय गोंधळ, चलनांची कमजोरी, आणि ‘सेफ हेवन’चा गजर—या सगळ्यांनी जानेवारीत रॅलीला वेग दिला. आता मात्र तोच वेग उलट दिशेला. म्हणजे बाजार आपल्याला नेहमी सांगतो—“अती तिथे माती.” आज घसरण आहे म्हणून उद्या संपलं असं नाही; पण आज चढ आहे म्हणून उद्या स्वर्ग मिळेल, हीही खात्री नाही. गुंतवणूक म्हणजे लग्नासारखी—घाईत निर्णय घेतला तर नंतर सासुरवास कठीण होतो! म्हणून सोनं-चांदी ठेवायचीच असेल, तर भाव पाहून नाही, डोकं वापरून ठेवा. कारण बाजारात चमक तात्पुरती असते; शहाणपण मात्र दीर्घकाळ टिकतं.
या नाट्यमय घसरणीचा आकडा कागदावर उतरवला, तर अंगावर काटा येईल. MCX वर एप्रिल फ्युचर्समधील सोने तब्बल २ टक्क्यांहून अधिक घसरून सुमारे ₹1,45,000 प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आलं. म्हणजे कालपर्यंत छातीवर मिरवणारी ‘सुवर्णसुरक्षा’ आज वजन कमी झाल्यासारखी दिसतेय. तर दुसरीकडे, रुपेरी थाटात मिरवणारी चांदी थेट आपटली—मार्च वायदा चांदी ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून सुमारे ₹2,57,500 प्रति किलोच्या आसपास घुटमळताना दिसली. सराफ बाजारात आज भाव पाहून नाही, तर श्वास रोखून व्यवहार होतायत, अशी अवस्था आहे.
