ट्रम्प यांचा दहा मिनिटांत हल्ल्याचा इशारा; इराणचा दीर्घ संघर्षाचा प्रतिदावा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरूनही तणाव
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। मध्यपूर्वेतील संघर्षाची ठिणगी पुन्हा भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील एक-दोन उर्वरित लक्ष्यांवर अवघ्या दहा मिनिटांत कारवाई करता येईल, असे सांगत लष्करी पर्याय खुला असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विशेषतः ‘पिकॲक्स माउंटन’ या संभाव्य अणुसंबंधित ठिकाणाचा उल्लेख केला. मात्र, अमेरिकेने हल्ल्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. ट्रम्प यांनी इराणसोबतची चर्चा सुरू असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे, इराणच्या लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अकरमिनिया यांनी नव्याने युद्ध पेटल्यास ते मागील संघर्षापेक्षा अधिक दीर्घकाळ चालू शकते आणि त्याचा शेवट कधी होईल हे अमेरिकेचे अध्यक्ष ठरवू शकणार नाहीत, असा इशारा दिला. म्हणजे एका बाजूला दहा मिनिटांत लक्ष्य उद्ध्वस्त करण्याची भाषा, तर दुसऱ्या बाजूला दीर्घ युद्धाची धमकी; या शब्दांच्या युद्धात प्रत्यक्ष रणांगण पेटले, तर त्याची किंमत केवळ सत्ताधाऱ्यांना नव्हे, तर सामान्य जनतेला मोजावी लागेल.
या तणावाला इस्रायलची राजकीय समीकरणेही जोडली गेली आहेत. ‘ॲक्सिओस’च्या वृत्तानुसार, ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात फोनवर चर्चा झाली. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर हल्ला करण्यासाठी नेतन्याहू आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र ट्रम्प यांनी चर्चेला आणखी संधी देण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसीन रेझाई यांना चर्चेबाबत पत्र पाठविल्याची माहितीही समोर आली आहे. रेझाई यांनी यापूर्वी गोठवलेली संपत्ती मुक्त करणे, नौदलाची नाकेबंदी उठवणे, निर्बंध हटवणे आणि सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया थांबवणे अशा अटी मांडल्या आहेत. मात्र, या चार अटींवर अमेरिकेने सहमती दर्शविल्याचे वृत्त नाही. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रश्नही या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रवक्ते हुसेन मोहेब्बी यांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला मुजतबा खामेनेई यांच्या संदेशाचा दाखला देत अमेरिकेसोबतच्या संघर्षाला भौगोलिक मर्यादा राहणार नसल्याचा इशारा दिला. परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इराण बचावासाठी सज्ज असल्याचे सांगतानाच मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. कतारच्या मध्यस्थीने चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे; मात्र थेट करार झालेला नाही. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्षांचे मुत्सद्दी सल्लागार अन्वर गर्गाश यांनी मनामा परिषदेत बोलताना राजनैतिक तोडगा निघावा अशी आशा व्यक्त केली, पण आखाती देश सर्वात वाईट परिस्थितीसाठीही तयार असल्याचे सांगितले. युद्धाच्या धमक्या देणे सोपे; परंतु क्षेपणास्त्रांचा धूर, ऊर्जा पुरवठ्यातील अडथळे आणि विस्थापितांचे दुःख यांची किंमत सामान्य माणसालाच चुकवावी लागते. त्यामुळे ट्रम्प, नेतन्याहू आणि तेहरानमधील नेतृत्वाने घोषणांपेक्षा संवादाला प्राधान्य देणे हीच जगाच्या हिताची बाब आहे.
