![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २८ डिसेंबर २०२५ |रशिया–युक्रेन युद्ध थांबण्याऐवजी अधिक धगधगत चालले आहे. जगभरातून शांततेच्या हाका येत असतानाच, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी थेट आणि गंभीर इशारा दिल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्या संभाव्य भेटीपूर्वीच पुतिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे— “शांतता मान्य केली नाही, तर युद्धाचा भडका उडेल!”
गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेलं हे युद्ध आता केवळ दोन देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. रशिया विरुद्ध पाश्चिमात्य देश असा थेट संघर्षाचा सूर अधिक ठळक होत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर पुतिन यांनी शांतता चर्चांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. “युक्रेन शांततेसाठी तयार नसेल, तर रशिया आपल्या सर्व लष्करी बळाचा वापर करून उद्दिष्टं साध्य करेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
या वक्तव्याला आणखी गंभीर संदर्भ आहे. कारण नुकताच रशियाने युक्रेनची राजधानी कीववर तब्बल ५०० ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी पुतिन यांनी आपली भूमिका जगासमोर मांडली.
पुतिन यांच्या मते, युक्रेन सरकार शांततापूर्ण तोडग्यासाठी फारशी तत्परता दाखवत नाही. अमेरिकेने यापूर्वी मांडलेल्या पहिल्या शांतता प्रस्तावाला रशियाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्या प्रस्तावाला थेट युक्रेननेच विरोध केला होता. विशेष म्हणजे, या सगळ्या घडामोडींच्या वेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुढील निर्णयांमध्ये अमेरिकेची भूमिका निर्णायक ठरणार, हे स्पष्ट आहे.
रशियन सरकारी वृत्तसंस्था TASS च्या माहितीनुसार, पुतिन यांनी स्पष्ट केलं की, “कीवमधील अधिकारी जर हा संघर्ष शांततेने सोडवण्यास तयार नसतील, तर रशिया ‘विशेष लष्करी बळाचा’ वापर करून आपले सर्व उद्देश पूर्ण करेल.” त्यांनी युक्रेनकडून शांतताकराराबाबत कोणतीही ठोस इच्छाशक्ती दिसत नसल्याची खंतही व्यक्त केली.
एकीकडे ट्रम्प–झेलेन्स्की भेटीची चर्चा, दुसरीकडे पुतिन यांचा थेट इशारा—या दोन टोकांच्या भूमिकांमुळे जागतिक राजकारण तापलं आहे. शांततेचा मार्ग मोकळा होणार, की युद्ध अधिक भडकणार? हा प्रश्न आता केवळ युक्रेनपुरता उरलेला नाही, तर संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेशी जोडला गेला आहे.
थोडक्यात काय, शांततेचा हात पुढे येणार की रणधुमाळीचा आवाज वाढणार—याचा फैसला आता येत्या काही दिवसांत होणार आहे. पण पुतिन यांचा इशारा स्पष्ट आहे: शांतता नाही, तर युद्ध आणखी तीव्र!
