![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिनांक २६ फेब्रुवारी २०२६।। पुण्यात वाहतूक नियम मोडून ई-चलनाची नोटीस खिशात ठेवणाऱ्यांसाठी आता इशारा नव्हे, तर थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. Pune Traffic Police यांनी जाहीर केले आहे की, बजावलेला दंड ३० दिवसांत न भरल्यास संबंधित वाहनचालकाचा ड्रायव्हिंग परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. २०१९ पासून शहरात ई-चलन प्रणाली लागू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग टिपला जातो आणि दंडाची नोटीस मोबाईलवर पाठवली जाते; मात्र लाखो प्रकरणांत दंड प्रलंबितच असल्याचे आढळले. परिणामी, शिस्त आणि वसुली या दोन्ही आघाड्यांवर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठवून ३० दिवसांची अंतिम मुदत दिली जाणार आहे. या कालावधीत दंड न भरल्यास संबंधित प्रकरण Regional Transport Office (RTO) कडे पाठवून परवाना निलंबनाचा प्रस्ताव मांडला जाईल. शिवाय, चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्याचीही तरतूद आहे. नोटीस ‘MHPECH-G’ या अधिकृत शॉर्ट कोडवरून एसएमएसद्वारे २६ ते २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीतच पाठवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीबाहेर येणारे संदेश संशयास्पद समजावेत, असा इशाराही देण्यात आला आहे.
दंड भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ, PTP अॅप किंवा वाहतूक विभागाच्या कार्यालयातील ई-चलन मशिनचा वापर करावा. क्यूआर कोड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी कोणतीही APK फाइल डाउनलोड करू नये, ओटीपी कोणालाही सांगू नये आणि फक्त अधिकृत माध्यमांतूनच व्यवहार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद लिंक, कॉल किंवा मेसेज आल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
वाहतूक शिस्त ही केवळ दंडाची बाब नसून, प्रत्येकाच्या सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे “आज नाही तर उद्या” अशी भूमिका आता चालणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. ३० दिवसांची ही मुदत म्हणजे शेवटची संधी—नियम पाळा, दंड भरा आणि परवाना सुरक्षित ठेवा!
