महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ फेब्रुवारी २०२६ ।। गेल्या तीन-चार वर्षांत सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरांनी २०२५ मध्ये विक्रमी पातळी गाठली. एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,९३,०९६ रुपयांपर्यंत पोहोचल्याने गुंतवणूकदारांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्याच नजरा आता पुढील कलावर खिळल्या आहेत. सोन्याची ही तेजी कायम राहणार की दरात मोठी घसरण होणार, याबाबत उत्सुकता वाढली असतानाच World Gold Councilचे मुख्य कार्यकारी अधिकारी David Tait यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
‘रायझिंग इंडिया समिट २०२६’मध्ये बोलताना टेट यांनी स्पष्ट केले की भू-राजकीय अनिश्चितता आणि केंद्रीय बँकांकडून होणारी मोठ्या प्रमाणातील खरेदी ही सोन्याच्या दरवाढीमागील दोन प्रमुख कारणे आहेत. जागतिक पातळीवरील तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. त्यातच अनेक देशांच्या केंद्रीय बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत असल्याने मागणी मजबूत राहिली आहे.
घसरण कधी शक्य?
डेव्हिड टेट यांच्या मते, सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट तेव्हाच संभवते जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था ६ ते ७ टक्क्यांच्या मजबूत दराने वाढेल आणि त्यासोबत महागाई मर्यादित पातळीवर राहील. अशा परिस्थितीत सार्वजनिक कर्जात घट होऊ शकते आणि गुंतवणूकदारांचा कल इतर मालमत्तांकडे वळू शकतो. मात्र, सध्याच्या जागतिक परिस्थितीत अशी शक्यता कमी असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०२५ मधील विक्रमी वाढ
२०२५ मध्ये जागतिक सोन्याची मागणी उच्चांकावर पोहोचल्याचेही टेट यांनी सांगितले. भारतात अंदाजे ७११ टन सोन्याची मागणी नोंदली गेली. वाढत्या किमतींमुळे दागिन्यांची मागणी काहीशी कमी झाली असली तरी गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी वाढली आहे. वर्षाच्या सुरुवातीला ७६,०००-७७,००० रुपयांच्या दरम्यान असलेले भाव वर्षअखेरीस १,३५,००० रुपयांवर गेले, म्हणजेच सुमारे ६० ते ७० टक्क्यांची वाढ झाली.
एकूणच, जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थिती स्थिर होत नाही तोवर सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवूनच निर्णय घ्यावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
