![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मार्च २०२६ ।। रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे—फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्र जमा होणार का? फेब्रुवारी महिना संपला तरी अनेक महिलांच्या खात्यात त्या महिन्याचा ₹१५०० चा हप्ता जमा झालेला नाही. उलट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेला असून लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता मार्च महिना सुरू झाल्याने “या महिन्यात दोन हप्ते मिळणार का?” असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे.
फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये दिला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या महिन्यात कधीही ₹१५०० रुपये खात्यात जमा होऊ शकतात. मात्र अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. याआधी एकदा दोन हप्ते एकाच महिन्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून ₹३००० रुपये एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी शासन लवकरच स्पष्टता देईल, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, केवायसीमधील त्रुटींमुळे अनेक महिलांचे हप्ते रखडले आहेत. डिसेंबरपासून काहींना एकही रक्कम मिळालेली नाही. अशा लाभार्थ्यांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे चार हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च हा केवायसी दुरुस्तीचा शेवटचा कालावधी मानला जात असून, त्यानंतर प्रलंबित रक्कम जमा केली जाऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे आणि केवायसी तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिकृत आदेशानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल; तोपर्यंत मात्र लाडक्या बहिणींची नजर बँक खात्यावर खिळलेली आहे.
