Gold-Silver Price : युद्धाचा ज्वालामुखी पेटला आणि सोने-चांदी आकाशाला भिडली! दोन दिवसांत ९ हजारांची उसळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मार्च २०२६ ।। इराण–इस्त्रायल युद्धाचा भडका उडताच जागतिक बाजारपेठेत भीतीचे ढग दाटून आले आणि त्याची पहिली ठिणगी थेट सराफा बाजारात पडली. युद्धजन्य वातावरण, अनिश्चितता आणि महासत्तांच्या हालचाली यामुळे गुंतवणूकदारांनी जोखमीच्या बाजारातून हात काढून सुरक्षिततेच्या दिशेने धाव घेतली. परिणामी अवघ्या दोन दिवसांत सोन्याने तब्बल ९ हजार रुपयांची झेप घेत शहरात प्युअर सोन्याचा तोळा १ लाख ७४ हजारांवर पोहोचला. चांदीनेही कमीपणा मानला नाही; १६ हजारांची उसळी घेत प्रतिकिलो ३ लाख १ हजारांचा नवा उच्चांक गाठला. युद्ध पश्चिम आशियात धगधगत असलं तरी त्याची ज्वाला आपल्या खिशापर्यंत पोहोचली आहे, हेच या दरवाढीने दाखवून दिलं.

अमेरिका-इराण-इस्त्रायल तणावाच्या छायेत शेअर बाजारात चढ-उतार वाढले आहेत. जोखीम वाढली की सोनं चमकतं, हा बाजाराचा जुना नियम पुन्हा एकदा खरा ठरला. शुक्रवारी (दि. २७) १ लाख ६५ हजारांच्या घरात असलेलं सोने युद्धाच्या बातम्या धडकताच थेट १ लाख ७४ हजारांवर जाऊन ठेपलं. ही केवळ आकड्यांची वाढ नाही; ती गुंतवणूकदारांच्या मानसिकतेतील बदलाची साक्ष आहे. ‘सुरक्षित गुंतवणूक’ हा शब्द पुन्हा चर्चेत आला असून, बँक ठेवींपेक्षा आणि शेअर्सपेक्षा सोन्यालाच प्राधान्य दिलं जात आहे. लग्नसराईच्या हंगामात ही उसळी सामान्य ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम करणारी ठरणार आहे.

चांदीनेही युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवलं. मागील दोन दिवसांत १६ हजारांनी वाढत सोमवारी (दि. २) प्रतिकिलो ३ लाख १ हजार रुपयांचा दर गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली खरेदी आणि चलनातील अस्थिरता यामुळे ही तेजी आणखी टिकण्याची चिन्हे आहेत. जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांच्या मते, युद्धाचा तणाव लवकर निवळला नाही तर सोने-चांदीचे भाव आणखी वधारू शकतात.

युद्धाचे रणशिंग हजारो किलोमीटर दूर वाजत असले तरी त्याचा आवाज आपल्या बाजारात घुमतो आहे. सुरक्षिततेच्या शोधात गुंतवणूकदार सोन्याकडे धावत आहेत, आणि त्या धावण्याची किंमत सर्वसामान्यांना मोजावी लागत आहे. पुढील काही दिवसांत जागतिक परिस्थिती कोणता कलाटणी घेते, यावरच सराफा बाजाराचा पुढचा अंक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *