Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाची धग भारतात! तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प; शेतकरी-ग्राहक दोघेही कात्रीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मार्च २०२६ ।। पश्चिम आशियात सुरू झालेल्या इराण–इस्त्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट भारतात उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भारतला या युद्धाची झळ बसण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. युद्धाला अवघे चार दिवस झाले असताना तेलाच्या किमतीत उसळी, सुकामेव्याच्या दरात वाढ, तसेच निर्यात अडकल्याने शेतमालाच्या भावात घसरण—अशी दुहेरी कात्री निर्माण झाली आहे.

हॉर्मुज सामुद्रधुनीचा अडथळा, व्यापारावर सावट

भारताचा पश्चिम आशियाशी होणारा मोठा व्यापार हॉर्मुज सामुद्रधुनी मार्गे होतो. या सामुद्रधुनीत तणाव वाढल्याने जहाजांच्या विमा प्रीमियममध्ये वाढ झाली आहे. परिणामी आयात-निर्यातीचा खर्च वाढतो आहे. इराणमधील चाबाहार बंदर भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे; मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे येथील हालचालींवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल, खते आणि सुकामेवा महागणार?

इराणकडून भारताने कच्च्या तेलाची आयात पूर्वीपेक्षा कमी केली असली तरी जागतिक बाजारातील दरवाढीचा फटका बसतोच. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय पेट्रोकेमिकल आणि रासायनिक खतांच्या आयातीवर परिणाम झाल्यास खतांच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढू शकतात.
सुकामेवा—खजूर, बदाम, पिस्ता—यांच्या किमतीत वाढ झाल्याचे क्रॉफर्ड मार्केट आणि वाशी मार्केटमध्ये दिसून येत आहे.

निर्यात ठप्प; शेतकरी संकटात

पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर जाणारा नाशिकचा कांदा सध्या मुंबई बंदरावर अडकला आहे. सुमारे १६० कंटेनर निर्यातीअभावी थांबले असल्याचे चित्र आहे. निर्यात बंद पडल्याने देशांतर्गत आवक वाढून कांद्याचे दर कोसळण्याची भीती आहे.
तसेच जळगावमधून आखाती देशांत जाणारी केळी निर्यातही थांबली आहे. युद्धापूर्वी २५०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता १५०० रुपयांवर आल्याचे सांगितले जाते. नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. रमजानच्या काळात पश्चिम आशियातून येणारी द्राक्षांची मागणीही ठप्प झाली आहे.

इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा आयातदार असल्याने पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनाही फटका बसतो आहे.

सोन्या-चांदीत उसळी, शेअर बाजार घसरला

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका दिवसात सोन्याचे दर सुमारे ७ हजारांनी, तर चांदीचे २० हजारांनी वाढल्याचे बाजारात दिसून आले. दरम्यान, गुंतवणूकदारांच्या अस्वस्थतेमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स ८०० ते ९०० अंकांनी घसरल्याचे चित्र आहे.

पश्चिम आशियात युद्ध भडकले असले तरी त्याचे आर्थिक पडसाद भारतात उमटत आहेत. तेलापासून ते तांदळापर्यंत आणि शेअर बाजारापासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत—या संघर्षाची धग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. युद्ध लवकर थांबले नाही, तर त्याचे परिणाम आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *