![]()
११ वर्षांची अखंड सेवा; जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि मान्यवरांचा सत्कार
महाराष्ट्र २४ ।। मोरवाडी प्रतिनिधी ।। दि. १ जून २०२६ ।। मोरवाडी परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. दर रविवारची अखंडित साप्ताहिक पूजा समितीच्या वतीने मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. २०१५ पासून सुरू झालेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मेघडंबरी उभारण्यात आल्यानंतर समितीचे प्रमुख दिपक भोजने यांनी सुरू केलेली ही आगळीवेगळी परंपरा आता समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही मध्यरात्रीच्या अभिवादन कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. फटाक्यांच्या रोषणाईने परिसर उजळून निघाला असताना दिपक भोजने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सकाळी सौ. रेणुका भोजने, भरत महानवर आणि विजय महानवर यांनीही पुष्पहार अर्पण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या लोककल्याणकारी कार्याची आठवण काढत आदरांजली वाहिली.
समितीच्या कार्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण दर रविवारची अखंडित साप्ताहिक पूजा या उपक्रमाला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर आणि समाजबांधवांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख दिपक भोजने यांनी दिली. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा संगम घडवून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा समितीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अॅड. दत्ता शेंडगे, जयपाल दगडे, विजय भोजने, विजय महानवर, अशोक शेजाळ, सुनील माने, मनोहर सुरवसे, देवराम बिरगड, विनोद बरकडे, सुभाष हाके, सुमेध कावळे, संभाजी लासके, शहाजी दन्ने, अनिल लंभाते, प्रदीप वाघमोडे, निरज भोजने, अमोल महानवर, आकाश टिळे, भाऊसाहेब सोलनकर, सचिन महानवर, बालाजी सोन्नर, छगन कोले, मोहन शेंबडे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. समाजहित आणि सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, आगामी रक्तदान शिबिर आणि सत्कार सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.