Pune Parking Policy: पुण्यात पार्किंगचा नवा आराखडा

Spread the love

Loading

१५ डिसेंबरपासून प्रायोगिक अंमलबजावणी; एफ. सी. रोड, सेनापती बापट रस्त्यावर नो-पार्किंग, रिक्षाथांबे आणि वाहनतळांच्या जागांचे होणार स्पष्ट मार्किंग

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पुण्याच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली, रस्ते मात्र तेवढेच अरुंद राहिले आणि त्यात बेशिस्त पार्किंगची भर पडली की वाहतूक कोंडीचा फास आवळणारच! अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेला आता पार्किंगच्या शिस्तीची जोड देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. येत्या १५ डिसेंबरपासून नव्या पार्किंग धोरणाची प्रायोगिक अंमलबजावणी करण्याचे नियोजन असून, सुरुवातीचे दोन ते तीन महिने त्याचा आढावा घेतला जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. एफ. सी. रोड आणि सेनापती बापट रस्त्यासारख्या प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. अशा परिस्थितीत केवळ अतिक्रमणांवर हातोडा चालवून प्रश्न सुटणार नाही; वाहनांना जागा कुठे द्यायची आणि कुठे थांबवायचे नाही, याचे स्पष्ट नियोजन आवश्यक असल्याचे आयुक्तांनी अधोरेखित केले.

नव्या धोरणानुसार नो-पार्किंग क्षेत्रांचे फलक, रिक्षाथांब्यांचे अधिकृत फलक आणि रस्त्यांवरील वाहनतळांच्या जागांचे रंगीत मार्किंग केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय बैठका सुरू असून, १५ डिसेंबरपर्यंत प्राथमिक तयारी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, फलक लावणे आणि रस्त्यावर रंगाचे पट्टे मारणे म्हणजे पार्किंगचा प्रश्न सुटला, असे समजण्याची चूक प्रशासनाने करू नये. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, टोइंगची प्रभावी व्यवस्था, अधिकृत पार्किंगची पुरेशी उपलब्धता आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पुणे महापालिकेचे २०१६ चे सार्वजनिक पार्किंग धोरणही अस्तित्वात आहे; त्यामुळे नव्या उपक्रमात जुन्या धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी कितपत झाली, याचाही हिशेब नागरिकांसमोर मांडणे गरजेचे आहे.

हॉटेल व्यावसायिकांकडून व्हॅलेट पार्किंगच्या नावाखाली ग्राहकांची वाहने दुसऱ्या रस्त्यांवर उभी केली जात असल्याच्या प्रकारांवरही नियंत्रण आणण्याचा आयुक्तांचा इरादा आहे. पार्किंगसाठी जागा नसताना ग्राहकांकडून वाहन स्वीकारून सार्वजनिक रस्ते खासगी वाहनतळ बनवण्याचा प्रकार रोखला पाहिजे. यापूर्वी एफ. सी. रोडवरील मिलेनियम प्लाझा पार्किंगचा ठेका अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य ठेवण्यासाठी जागेचा वापर झाल्याने रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पार्किंग व्यवस्थापनातील गैरप्रकारांकडे प्रशासनाचे लक्ष जाणे आवश्यक आहे.

पार्किंग धोरणाबरोबरच पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र धोरण पुढील १० ते १५ दिवसांत सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही नवल किशोर राम यांनी सांगितले. आता प्रश्न एवढाच—१५ डिसेंबरला फलक झळकतील; पण त्यानंतर नियमांची अंमलबजावणीही तितक्याच कडकपणे होणार का? दोन-तीन महिन्यांचा प्रयोग कागदावरचा अहवाल न ठरता पुणेकरांना प्रत्यक्ष दिलासा देणारा ठरला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *