भिवंडीत ६८ टन अन्नसाठा जप्त; पुण्यात सहा, वर्ध्यात पाच हॉटेलांचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढे यांच्या FDA ची राज्यभर धडक मोहीम
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। खाद्यपदार्थांच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्नसुरक्षा नियम धाब्यावर बसवणाऱ्या राज्यातील १४ आस्थापनांचे परवाने किंवा व्यवसायाचे कामकाज निलंबित करण्यात आले आहे. या मोहिमेत तब्बल १ कोटी ५३ लाख ५८ हजार ३६८ रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला, तर प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि वाहनांसह ६७ लाख ५५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दोन गुन्हे दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पुण्यातील सहा आणि वर्ध्यातील पाच हॉटेल, रेस्टॉरंट व बेकरींचे परवाने निलंबित झाल्याने खाद्यव्यवसायातील स्वच्छता आणि गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वेहळे येथील मे. युनिबॉर्न फूड इंग्रेडियंट्स एलएलपीच्या गोदामावर छापा टाकून प्रशासनाने ६८ हजार २४ किलो अन्नपदार्थ आणि घटक जप्त केले. त्यांची किंमत तब्बल १ कोटी ५३ लाख १५ हजार ९७० रुपये आहे. पॅकेजिंग आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
या गोदामातून स्टार्च, व्हे पावडर, सेल्युलोज गम, झॅन्थन गम, पिझ्झा पीठ, फेटा चीज आणि मॅस्करपोन यांसारखे पदार्थ जप्त करण्यात आले. अन्नपदार्थांच्या पॅकेजिंग आणि लेबलवरील नियमांचे पालन न करणे ही केवळ कागदोपत्री चूक नसून ग्राहकांना मिळणाऱ्या अन्नाच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. कळवा येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणारे वाहनही पकडण्यात आले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कराड येथील मे. प्रोटीन मार्टवर २६ नोव्हेंबरला तपासणी करण्यात आली. तेथे २२ हजार ४०० रुपये किमतीचे १६ न्यूट्रास्युटिकल टेस्टो जीएच कॅप्सूलचे जार आणि १९ हजार ९९८ रुपये किमतीचे दोन फाल्कन फार्मा व्हे प्रोटीन पावडरचे जार जप्त करण्यात आले. एकूण ४२ हजार ३९८ रुपयांचा ६.०९२ किलो साठा ताब्यात घेण्यात आला. उत्पादकाच्या परवान्यात टेस्टो जीएच कॅप्सूलची मंजुरी नव्हती, तर आयात केलेल्या व्हे प्रोटीनसाठी पुरवठादाराकडे वैध आयात परवाना नव्हता. ऑरगॅनिक ब्राऊन राइस केकवर आवश्यक प्रमाणपत्र आणि लोगोही आढळला नाही.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे खाद्यव्यवसायातील नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, छापे टाकणे आणि साठा जप्त करणे एवढ्यावरच प्रशासनाने समाधान मानू नये. जप्त केलेल्या नमुन्यांच्या प्रयोगशाळा तपासण्या, दोषींवरील खटले आणि अंतिम कायदेशीर कारवाईही तितक्याच वेगाने झाली पाहिजे. कारण ग्राहकांच्या ताटात काय वाढले जाते, याची खात्री करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. हॉटेलच्या आकर्षक सजावटीपेक्षा स्वयंपाकघरातील स्वच्छता, पदार्थांची गुणवत्ता आणि कामगारांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. नियमभंग करणाऱ्यांना केवळ नोटिसा देऊन सोडले, तर अशा कारवायांचा धाक उरणार नाही. अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सातत्याने आणि कोणताही मुलाहिजा न ठेवता झाली, तरच ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण होईल.
