विशेष लेख ; “कोविड सोबतचे जग “

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – प्रतिज्ञा पवार शेटे – पिंपरी चिंचवड – दि. १९ सप्टेंबर -: सध्या कोवीड विषाणूच्या होणाऱ्या प्रचंड संसर्गाने संपूर्ण मानवजात हतबुद्ध झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात या विषाणूचा भारतात शिरकाव झाला. परदेशात फिरण्यासाठी गेलेल्या वृद्ध जोडप्याने आपल्यासोबत हा आजार भारतात आणला. पुण्यात सुरुवात झालेल्या या आजाराने आता अख्खा देश आपल्या विळख्यात घेतला आहे. जानेवारीच्या मध्यावर जगभरात हळूहळू पसरणाऱ्या या भीषण आजाराची दाखल घेत केंद्र आणि राज्य सरकारांनी कठोर उपाययोजना वेळीच केल्या असत्या तर आज काही प्रमाणात या रोगाचा फ़ैलाव कमी दिसला असता. मात्र, त्यावेळी केंद्रात आणि राज्यात सरकार आणि पर्यायाने प्रशासन राजकीय कब्बडी खेळण्यात व्यस्त होते. सरकार बनवण्याची आणि पाडण्याची सर्कस चाललेली होती आणि कोरोनाचा संसर्ग भारत येणारच नाही अशा गैरसमजात बाळबोध असल्याप्रमाणे राज्यकर्ते मश्गुल होते. पण त्यांच्या या नाकर्तेपनाचा त्रास सहन करावा लागला सामान्य जनतेला. मोठ्या शहरांमध्ये कामाला असणाऱ्या पांढरपेशा नोकरदारांपासून ते वेठबिगारी, मजूर, रस्त्यावर ठेले असणारे, छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये कामे करणारे अशा सर्वांवरच अगदी अचानकपणे लॉकडाऊनची कुर्हाड कोसळली आणि कोणतेही नियोजन न करता करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे एका क्षणात ठप्प झाले.

कोरोनाच्या हाहाकाराने सर्वांच्या आयुष्याची दिशाच बदलली आहे. सर्व क्षेत्रातील कामांची घडी विस्कटली असून आता ५ ते ६ महिन्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण याचा खूप दूरगामी परिणाम शिक्षण,आरोग्य, उद्योग, नोकरी, क्रिडा, कला, अर्थ अशा सर्वच क्षेत्रांवर दिसून येत असून संसर्गाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्वांचा आढावा घेणारे “कोविड सोबतचे जग ” हे सादर आपण सुरु करत आहोत. या सदरामध्ये या सर्व क्षेत्रात झालेले बदल, आलेल्या अडचणी आणि आता पुन्हा सर्व सुरळीत करण्याच्या प्रयत्नात करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. तसेच या सर्व बदलत फक्त हतबल न होता एक नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकणार आहोत. तर वाचकहो सज्ज व्हा उद्यापासून या “कोविड सोबतच्या जगामध्ये” प्रवेश करायला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *