![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ एप्रिल २०२६ ।। नवी दिल्ली : घरात स्वयंपाक करण्यासाठी लागणारा गॅस आता ‘गरज’ कमी आणि ‘ताण’ जास्त वाटू लागला आहे. India मध्ये एलपीजी सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असताना त्यावर लावलेले कर सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो, तर हॉटेल-ढाबे आणि उद्योगधंद्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल सिलेंडरवर तब्बल १८ टक्के जीएसटी आहे. म्हणजेच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसवरही करांचा इतका मोठा बोजा टाकला गेला आहे की, ‘गॅस महाग की कर?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.
सध्याच्या दरांचा विचार केला तर राजधानी Delhi मध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत सुमारे ₹९१३ इतकी आहे, तर कमर्शियल सिलेंडर तब्बल ₹२०७८.५० रुपयांना मिळत आहे. यामध्ये अनुक्रमे ५% आणि १८% जीएसटी समाविष्ट आहे. जर हा कर पूर्णपणे हटवला, तर घरगुती सिलेंडर जवळपास ₹४३ ने स्वस्त होऊन ₹८६९ च्या आसपास मिळू शकतो, तर कमर्शियल सिलेंडरमध्ये तब्बल ₹३१७ ची घट होऊन तो ₹१७६० च्या आसपास येऊ शकतो. म्हणजेच कर कमी केल्यास थेट ग्राहकांच्या खिशाला दिलासा मिळणार हे स्पष्ट आहे. तरीही सरकारकडून याबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
दरम्यान, पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजी गॅसवर जीएसटी लागू नसला तरी राज्य सरकारांकडून व्हॅट आकारला जातो, जो साधारण ३ ते १४.५ टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे ‘एलपीजी महाग, पीएनजीही स्वस्त नाही’ अशी दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे. Chamber of Trade and Industry या व्यापारी संघटनेने पंतप्रधान Narendra Modi यांना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी दोन्ही टॅक्स-फ्री करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच इंधन दर वाढलेले असताना कराचा बोजा कमी केल्यास सामान्य नागरिक आणि लघुउद्योजकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
एकीकडे सरकार ‘पर्यावरणपूरक पर्याय’ म्हणून पीएनजीकडे वळण्याचा सल्ला देते, तर दुसरीकडे एलपीजीवर करांचा फास घट्ट होत चालला आहे. परिणामी, सामान्य माणूस नेमकं काय करावं या संभ्रमात सापडला आहे. शेवटी प्रश्न एकच—चुल पेटवताना धूर डोळ्यात जास्त जातोय की महागाईचा? कारण गॅसचा दर आणि कर यांचा हा दुहेरी फटका आता प्रत्येक घरात जाणवू लागला आहे.
