![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ एप्रिल २०२६ ।। पुणेकरांना एप्रिलमध्येच मे महिन्याची झळ बसू लागली आहे! Pune शहरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा चाळिशीकडे झेपावला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर Lohegaon येथे तापमान थेट ४१ अंशांच्या पुढे गेले. या पार्श्वभूमीवर India Meteorological Department ने १५ एप्रिलसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दिवसांत तापमानात तब्बल ३ ते ४ अंशांनी वाढ झाल्याने सकाळपासूनच उष्णतेचे चटके जाणवू लागले आहेत. मगरपट्टा, विश्रांतवाडी, हडपसर, कोरेगाव पार्कसारख्या भागांमध्ये नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत. सुट्टीच्या दिवशी बाहेर पडताना टोपी, स्कार्फ आणि पाण्याच्या बाटल्या हेच नागरिकांचे ‘हत्यार’ बनले होते. दिवसभर आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा तीव्रपणा अधिक जाणवत आहे.
फक्त दिवसच नव्हे, तर रात्रीही उकाड्याने हैराण करणाऱ्या ठरत आहेत. किमान तापमानातही वाढ झाल्याने गारवा कमी झाला आहे. रविवारी किमान तापमान २०.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असून किमान तापमानही २२ अंशांपर्यंत पोहोचू शकते.
एकूणच, पुण्यात उष्णतेचा कहर वाढत चालला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. पुढील काही दिवस ‘हॉट’च असणार, हे मात्र नक्की!
