सोनं थांबलं, चांदी घसरली ; लग्नसराईत खरेदीदारांचा गोंधळ वाढला !

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल २०२६ ।। लग्नसराईचा हंगाम रंगात आला की बाजारात सोन्या-चांदीची खरेदी उसळतेच. पण यंदा चित्र थोडं वेगळं आहे. सोन्याचे दर आधीच आकाशाला भिडलेले, त्यात रोजच्या चढ-उतारामुळे खरेदीदार गोंधळलेले. “आता घ्यावं की थांबावं?” हा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतानाच आज सोन्याच्या दरांनी ब्रेक घेतला आहे. अनेक दिवसांच्या हालचालीनंतर आज दर स्थिर राहिल्याने बाजारात एक प्रकारची शांतता दिसते, पण ही शांतता किती दिवस टिकणार याची उत्सुकता कायम आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,५५,२९० रुपयांवर स्थिर आहे. ८ ग्रॅमसाठी १,२४,२३२ रुपये, तर १० तोळ्यांसाठी तब्बल १५,५२,९०० रुपये मोजावे लागत आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दरही स्थिर असून प्रति तोळा १,४१,३५० रुपये आहेत. ८ ग्रॅमसाठी १,१३,८८० रुपये, तर १० तोळ्यांसाठी १४,२३,५०० रुपये अशी किंमत आहे. दर स्थिर असले तरी ते कमी झालेले नाहीत, हीच खरी खंत खरेदीदारांच्या चेहऱ्यावर दिसते. “दर थांबले, पण खिशाला अजूनही झळ बसतेच,” अशी भावना बाजारात ऐकू येते.

दुसरीकडे, चांदीने मात्र आज वेगळाच खेळ केला आहे. सोनं स्थिर असताना चांदीचे दर घसरले आहेत. १ किलोमागे तब्बल १०,००० रुपयांची घट झाली असून १० ग्रॅम चांदी २,६५० रुपयांवर आली आहे. १०० ग्रॅमसाठी २६,५०० रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच, ज्यांना सोनं महाग वाटतंय, त्यांच्यासाठी चांदीचा पर्याय थोडा परवडणारा ठरतोय. बाजारात आता चर्चा एकच—सोनं अजून वाढणार का, की चांदीचाच चमकदार पर्याय स्वीकारायचा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *