Gold Silver Fall: घेऊ की नको… सोन्याच्या झळाळीला अचानक ब्रेक लागला ! गुंतवणूकदार बेजार!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मे २०२६ ।।Gold Silver Prices: गेल्या काही महिन्यांत सोन्याने अशी भरारी घेतली होती की, सामान्य माणूस दागिन्यांच्या दुकानात जाण्यापूर्वीच बँकेचा बॅलन्स तपासू लागला होता. चांदीची स्थितीही काही वेगळी नव्हती. गुंतवणूकदारांनी “आज घेतलं नाही तर उद्या महाग होईल” या भीतीने सोन्या-चांदीत पैसे ओतले; पण आता त्याच बाजाराने अचानक ब्रेक लावल्याने अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत. विक्रमी उंची गाठल्यानंतर आता दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण सुरू झाली असून, “घेऊ की नको?” असा प्रश्न लग्नसराईतील ग्राहकांपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच पडू लागला आहे. सोन्याची चमक कायम असली, तरी दरातील घसरणीने बाजारातील आत्मविश्वासाला मात्र थोडा गंज चढल्याचे चित्र आहे.

एमसीएक्सवर बुधवारी सकाळी सोन्याचे फ्युचर्स तब्बल ७७८ रुपयांनी घसरून १ लाख ५८ हजार २२५ रुपयांवर आले, तर चांदीच्या जुलै फ्युचर्समध्येही १ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. यामागे अमेरिकन डॉलरची मजबुती, वाढते बाँड यील्ड आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबतची अनिश्चितता हे प्रमुख कारण मानले जात आहे. अमेरिकेतील १० वर्षांच्या बाँड यील्डने ४.६९ टक्क्यांचा टप्पा गाठल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. त्यातच नफावसुली सुरू झाल्याने सोन्या-चांदीच्या बाजारात विक्रीचा दबाव वाढला. एका काळी “सोनं कधीच खाली येत नाही” असा विश्वास बाळगणाऱ्यांनाही आता बाजाराचे गणित पुन्हा शिकावे लागणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शेअर बाजारासारखाच मौल्यवान धातूंचा बाजारही भावना, जागतिक राजकारण आणि अमेरिकन अर्थनीतीच्या तालावर नाचतो, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, देशांतर्गत बाजारात घसरण सुरू असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात चित्र थोडे वेगळे दिसत आहे. स्पॉट चांदी आणि स्पॉट सोन्याच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली असून, जागतिक गुंतवणूकदार अजूनही या धातूंना सुरक्षित पर्याय मानत आहेत. मात्र भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू असताना दरातील मोठ्या चढउतारामुळे ग्राहक संभ्रमात पडले आहेत. “आता घेतलं तर उद्या स्वस्त होईल का?” आणि “थांबलो तर पुन्हा महागेल का?” या प्रश्नांनी सराफा बाजारात चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदींनी मितव्ययाचा संदेश दिल्यानंतरही भारतीयांची सोन्यावरील मोहिनी काही कमी झालेली नाही; पण सध्या बाजाराने दिलेला धक्का पाहता गुंतवणूकदारांची अवस्था “हातात सोनं, पण मनात धडधड” अशी झाली आहे. शेवटी, सोन्याची झळाळी कायम असली तरी बाजारातील चढउतारांनी गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरील चमक मात्र थोडी फिकी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *