गौतमी-भाऊची जोडी रंगली, दादांचं गाणं पुन्हा दणाणलं!

Spread the love

Loading

५२ वर्ष जुन्या गावरान ठेक्याला नवा जलवा; ‘हिल हिल पोरी हिला’वर महाराष्ट्र थिरकला

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून २०२६ ।। मराठी मनोरंजन विश्वात काही गाणी ही केवळ गाणी नसतात, ती एक सांस्कृतिक आठवण असतात. दादा कोंडकेंच्या चित्रपटांमधील गावरान ठसका, मिश्किल शब्द आणि ग्रामीण जीवनाचा रंग यामुळे त्यांची गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. अशाच एका अजरामर गाण्याने आता नव्या रूपात पुनरागमन केले असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तब्बल ५२ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या ओठांवर चढलेलं “हिल हिल पोरी हिला…” हे गाणं नव्या ढंगात सादर करण्यात आलं असून, या गाण्याची सर्वात मोठी आकर्षक बाब म्हणजे विनोदवीर भाऊ कदम आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांची पहिलीवहिली जोडी.

गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रात लोकप्रियतेचं दुसरं नाव बनलं आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजारोंची गर्दी उसळते. दुसरीकडे भाऊ कदम हे त्यांच्या सहज विनोदशैलीमुळे घराघरात पोहोचलेले कलाकार आहेत. या दोघांची जोडी एका गाण्यात पाहायला मिळेल, अशी कल्पनाही चाहत्यांनी केली नव्हती. मात्र या म्युझिक व्हिडिओने ती शक्यता सत्यात उतरवली आहे. कोकणातील हिरव्यागार निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात भाऊ कदम यांचा भन्नाट अंदाज आणि गौतमीचा झकास डान्स यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळते. त्यामुळे गाण्याला केवळ जुन्या आठवणींचा स्पर्श नाही, तर नव्या पिढीचा उत्साहही लाभला आहे.

https://www.instagram.com/p/DZMU9MsPEjZ/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=28325c1a-7619-49bf-b5f8-e15fc3c92eb7

विशेष म्हणजे, या गाण्याला आधुनिक संगीताची जोड देताना मूळ गाण्याचा आत्मा जपण्यात यश आलं आहे. गायक रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या दमदार आवाजाने गाण्याला नवं चैतन्य दिलं आहे. जुन्या ठेक्यांवर आधुनिक बीट्सचा तडका देण्यात आल्याने तरुणाईही या गाण्याकडे आकर्षित झाली आहे. रिलीज होताच युट्यूब आणि सोशल मीडियावर या गाण्याने लाखो व्ह्यूज मिळवत ट्रेंडिंगच्या यादीत स्थान मिळवलं. अनेकांनी या गाण्याला ‘जुनं सोनं नव्या रूपात’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या गाण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे भाऊ कदम यांच्या मुलीची प्रतिक्रिया. मृण्मयी कदम हिने आपल्या वडिलांच्या डान्सचं मनापासून कौतुक करत “हे गाणं मला खूप आवडलंय” अशी प्रतिक्रिया दिली. चाहत्यांनीही कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडत भाऊ-गौतमी जोडीला भरभरून दाद दिली आहे. एकेकाळी गावागावात वाजणारा ठेका आता डिजिटल युगात पुन्हा घुमू लागला असून, दादांच्या गाण्याची जादू आजही तितकीच कायम असल्याचं या गाण्याने पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *