![]()
१० ते २३ जूनपर्यंत निर्बंध लागू; सभा, मिरवणुका आणि पाचपेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पोलिसांची कडक नजर
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून २०२६ ।। पिंपरी-चिंचवडकरांनी पुढील चौदा दिवस जरा जपून पावले टाकावीत, कारण शहरात आता कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने पोलिसांनी कडक शिस्तीचा बडगा उगारला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १० जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१) आणि ३७(३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता चौकातील गप्पांचे कट्टे, अचानक निघणारे मोर्चे किंवा परवानगीशिवाय होणाऱ्या सभा यांच्यावर थेट कायद्याचा अंकुश बसणार आहे.
या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, दंडुके, तलवारी, भाले, बंदुका किंवा इजा पोहोचवू शकणारी साधने बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. दाहक पदार्थ, स्फोटके किंवा धोकादायक वस्तू घेऊन फिरणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. मोठ्याने घोषणाबाजी करणे, प्रक्षोभक भाषणे देणे, प्रतिकात्मक पुतळे किंवा चित्रांचे दहन करणे, तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल अशा कृतींवरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कायद्याची चौकट अधिक घट्ट करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे कोणतीही सभा, आंदोलन किंवा मिरवणूक काढायची असल्यास पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. अन्यथा संबंधितांवर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. शहरात विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील पोस्ट, वादग्रस्त वक्तव्ये आणि अचानक निर्माण होणाऱ्या तणावाच्या घटनांमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
तथापि, हा आदेश शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना, अधिकृत कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगण्याची परवानगी असलेल्या व्यक्तींना आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या घटकांना लागू होणार नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम १३५ नुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पुढील चौदा दिवस शहरात कायद्याचे राज्य अधिक ठळकपणे दिसणार असून, नागरिकांनीही संयम आणि जबाबदारीची भूमिका घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
