महापालिकेच्या कामांना वेग देण्याचे निर्देश

Spread the love

Loading

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची आयुक्तांसोबत आढावा बैठक; विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रलंबित प्रकल्पांवर सखोल चर्चा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जून २०२६ ।। पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रशासकीय कामकाज, प्रलंबित प्रकल्पांची प्रगती तसेच नागरिकांशी संबंधित मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे स्वागत केले. यावेळी शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती आणि आगामी नियोजनाबाबत सादरीकरण करण्यात आले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही देण्यात आली.

बैठकीदरम्यान अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघासह शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, नगररचना, सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत विकासकामांचा सखोल आढावा घेतला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगररचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, उपआयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, कार्यकारी अभियंता विजय भोजणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विविध प्रकल्पांपुढील अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *