![]()
संतांच्या पालखीसाठी वाहतुकीचा त्याग; जेजुरी, सासवड, निरा, बारामती मार्गांवर मोठे बदल
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ जुलै २०२६ ।। संतांची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास! पण लाखो वारकऱ्यांच्या या महासागराला सुरक्षित वाट करून देताना प्रशासनाने वाहनचालकांसाठी मात्र मोठा ब्रेक लावला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासह जेजुरी, सासवड, निरा, बारामती आणि लोणंद परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक तब्बल १० ते १५ जुलै दरम्यान टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसमोर वाहनांचा वेग थांबवण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी सर्वसामान्य प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचा मोठा फेरा मारावा लागणार आहे. वेळेचे गणित, इंधनाचा खर्च आणि वाढणारी वाहतूक कोंडी यामुळे अनेकांचा प्रवास अक्षरशः लांबणार आहे.

यंदाच्या पालखी सोहळ्यात १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हा आणि १५ जुलै रोजी निरा येथे मुक्काम असणार आहे. या तीन दिवसांत सुमारे सात ते आठ लाख वारकरी पायी चालत असतात. त्यांच्या दिंड्या, रथ, सेवा वाहने आणि स्थानिक गर्दी यामुळे पालखी मार्गावरील प्रत्येक किलोमीटर संवेदनशील बनतो. म्हणूनच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष अधिसूचना जारी करून पुणे–पंढरपूर महामार्गावरील नियमित वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्याचे आदेश दिले आहेत. संतांच्या पालखीला अडथळा नको आणि भाविकांच्या जीवाशी खेळ नको, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला असला, तरी नागरिकांनी प्रवासाचे नियोजन वेळेत करणे आता अत्यावश्यक ठरणार आहे.
जेजुरी, बेलसर फाटा, मोरगाव, पारगाव मेमाणे, निरा, जेऊर फाटा, सासवड, सुपा आणि लोणंद या भागांत विविध तारखांना वेगवेगळे निर्बंध लागू राहणार आहेत. पुण्याकडे येणारी तसेच सातारा, फलटण, बारामती, लोणंद, उरुळी कांचन आणि मोरगावच्या दिशेने जाणारी वाहने पर्यायी मार्गांवरून वळवण्यात येणार आहेत. काही ठिकाणी तब्बल २४ तास वाहतूक बंद राहणार असून, काही मार्गांवर विशिष्ट वेळेतच प्रवेश दिला जाईल. त्यामुळे नेहमीचा मार्ग गाठण्यासाठी आता अनेक किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागू शकतो. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पालखी व्यतिरिक्त कोणत्याही वाहनाला बंद मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही.
वारी ही श्रद्धेची असते, पण तिचे व्यवस्थापन शिस्तीचे असते. दरवर्षी लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरीकडे निघतात आणि त्यांच्यासाठी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरते. त्यामुळे या काळात वाहनचालकांनी अधीरपणा न करता संयम ठेवणे, पर्यायी मार्गांचा वापर करणे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे. दोन दिवसांचा वळसा त्रासदायक वाटू शकतो; पण लाखो वारकऱ्यांचा सुरक्षित प्रवास आणि महाराष्ट्राच्या या महान परंपरेचे सुरळीत आयोजन हे त्याहून मोठे कर्तव्य आहे. म्हणूनच प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची ताजी माहिती तपासा, वेळेचे नियोजन करा आणि शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळा.