‘मास्क नाही प्रवेश नाही’ उपक्रम राज्यभर राबवायला हवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – कोल्हापूर – २६ सप्टेंबर – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ यासारख्या अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला.

पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हा्पूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे पालकसचिव सहभागी झाले होते.

कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. उज्ज्वला माने, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा. ही मोहीम लोकचळवळ व्हावी. यातून महाराष्ट्र आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजचे आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबवायला हवा.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, काही लोकांच्या बेपर्वाईमुळे संसर्ग वाढते आहे. यासाठी गृह विलगीकरण आणि गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतून नागरिकांच्या तपासणीबरोबरच त्यांना आरोग्य शिक्षण मिळणे गरजचे आहे. निरोगी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सक्रीय व्हावे. जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *