![]()
संत निरंकारी मिशनच्या शिबिरात ३६१ युनिट रक्तसंकलन; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र 24 – रुपीनगर, निगडी, दि. ३१ : माणसाच्या शरीरात रक्त वाहते; पण समाजात माणुसकी वाहिली, तरच समाज खऱ्या अर्थाने जिवंत राहतो! याच माणुसकीचा प्रत्यय रुपीनगर येथे रविवारी आला. संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशाल रक्तदान शिबिरात तब्बल ३६१ युनिट रक्तसंकलन झाले.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ३० ऑगस्ट रोजी हे शिबिर घेण्यात आले. मिशनचे अनुयायी तसेच परिसरातील नागरिकांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे गर्दी केली. रक्ताची गरज पडली की नातेवाईक शोधण्याची वेळ येऊ नये, यासाठी या रक्तदात्यांनी आधीच माणुसकीचे नाते जोडून ठेवले!
शिबिराचे उद्घाटन पुणे झोन प्रमुख अशोक आहुजा यांच्या हस्ते झाले. यावेळी संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि सेवाभावी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी आणि ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.
‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’ हा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी दिलेला मानवतेचा संदेश निरंकारी अनुयायांनी प्रत्यक्ष कृतीत उतरविला आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवापरंपरा अखंड सुरू आहे.
रक्तदानापुरतेच मिशनचे समाजसेवेचे काम मर्यादित नाही. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, नेत्रचिकित्सा शिबिरे, महिला सशक्तीकरण, बालविकास तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदत अशा विविध उपक्रमांतून रुपीनगर परिसरात सेवाकार्य सुरू असते. या सामाजिक कार्याची दखल केंद्र व राज्य सरकारांनीही वेळोवेळी घेतली आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी सेवादल आणि मिशनच्या अनुयायांनी अथक परिश्रम घेतले. रक्तदानाची जनजागृती करण्यासाठी परिसरात घरोघरी जाऊन संदेश देण्यात आला. रक्तदात्यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार प्रल्हाद गोगरकर यांनी मानले.
रक्ताचा प्रत्येक थेंब कुणाच्या तरी जीवनाला नवी सकाळ देऊ शकतो. रुपीनगरातील ३६१ रक्तदात्यांनी त्या सकाळीसाठी आपला वाटा उचलला—हीच खरी मानवसेवा!