![]()
SIR प्रारूप यादीत ७.७१ कोटी मतदार; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतीची संधी, त्यामुळे नाव गायब दिसले तरी घाबरू नका
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ सप्टेंबर २०२६ ।। महाराष्ट्राच्या मतदार यादीत झालेला मोठा बदल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR-२०२६ अंतर्गत राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, आधीच्या ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांच्या तुलनेत आता ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांची नोंद प्रारूप यादीत आहे. म्हणजे तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ नावे प्रारूप यादीत दिसत नाहीत. मात्र येथेच घाईघाईने ‘दोन कोटी मतदारांची कायमची हकालपट्टी’ असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही प्रकरणे प्रामुख्याने अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी किंवा गणना प्रपत्र न मिळालेल्या मतदारांशी संबंधित आहेत.
प्रारूप यादीतील ७.७१ कोटी मतदारांमध्ये ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष, ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला आणि ३ हजार ८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. SIRचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक करणे हा असला, तरी एखाद्या जिवंत आणि पात्र मतदाराचे नाव चुकून प्रारूप यादीतून गायब झाले तर त्याने हातावर हात ठेवून बसणे हा पर्याय नाही. निवडणूक आयोगाने दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दिला आहे. त्यानंतर छाननी होऊन ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
मग तुमचे नाव आहे की नाही, हे तपासायचे कसे? महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर SIR-२०२६ची स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवरही नाव शोधण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे CEO महाराष्ट्राच्या SIR विभागात २०२५च्या मतदार यादीत नाव होते पण SIRच्या प्रारूप यादीत दिसत नाही अशा मतदारांची ASDD यादीही उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ‘नाव गायब’ दिसले म्हणून मतदानाचा अधिकार संपला असे समजू नका; आधी अधिकृत यादी तपासा आणि गरज असल्यास दावा दाखल करा.
मतदार यादीतील हा बदल निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः स्थलांतर केलेले, जुन्या पत्त्यावर राहणारे किंवा गणना प्रक्रियेदरम्यान उपलब्ध न झालेले नागरिक यांनी आपले नाव तपासणे गरजेचे आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रक्रियेत संधी आहे. मतदानाच्या दिवशी केंद्रावर जाऊन ‘नाव नाही’ असे कळण्यापेक्षा आजच यादी तपासलेली बरी. लोकशाहीत मत देण्याचा अधिकार मोठा असतो; पण तो अधिकार वापरण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारीही तितकीच मोठी आहे.
