![]()
‘गणेशोत्सवाला विरोध नाही’; विचारांना उत्तर विचारांनीच द्या, बापटांचा स्पष्ट इशारा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ सप्टेंबर २०२६ ।। पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचला आहे. माध्यमांशी बोलत असताना सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. “मारहाण केल्याने माझा निश्चय ढळणार नाही,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी आपला लढा व्यक्तीविरोधात नसून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अतिरेकाविरोधात असल्याचे सांगितले. मत पटत नसेल तर प्रतिवाद करा, चर्चा करा; हात उचलणे हा लोकशाहीचा मार्ग नाही, असा त्यांचा सूर होता. हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून आरोपीला अटक झाल्याचे वृत्त आहे.
बापट यांनी गणेशोत्सवाला आपला विरोध नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. त्यांचा आक्षेप डीजे, लाऊडस्पीकरमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आणि मिरवणुकांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आहे. “सांस्कृतिक राजधानी” म्हणून पुण्याचा गवगवा करताना सार्वजनिक शिस्तही संस्कृतीचाच भाग मानली पाहिजे, असा त्यांचा सवाल आहे. डीजे, ढोल-ताशे किंवा ध्वनिवर्धकांचे कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेता येतील, अशी पर्यायी भूमिकाही त्यांनी मांडली. उत्सवाचा आनंद एका व्यक्तीचा असतो, पण त्याचा कर्णकर्कश आवाज संपूर्ण परिसराने का सहन करायचा, हा प्रश्न त्यांनी पुन्हा उपस्थित केला.
हल्ल्यानंतरही रविवारी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “जाण्याजोग्या परिस्थितीत असेन तर नक्की जाईन,” असे सांगत त्यांनी भीतीपोटी मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी, सार्वजनिक जीवनात मत मांडणाऱ्या व्यक्तीवर हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे राजकीय नेत्यांनीही म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसेचा निषेध करत सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनीप्रदूषणासह साजरे करण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे आता हा वाद केवळ डीजेचा राहिलेला नाही; तो कायदा, नागरिकांचा हक्क आणि उत्सवाच्या सार्वजनिक जबाबदारीचा बनला आहे.
पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे परंपरा, उत्साह आणि सार्वजनिक सहभाग यांचा संगम; पण उत्साहाच्या नावाखाली नियमांची पायमल्ली करण्याला उत्सव म्हणायचे की उन्माद, हा प्रश्न आता पुणेकरांसमोर उभा आहे. दुसरीकडे, नियम सांगणाऱ्याला मारहाण करून प्रश्न सुटत नाही; उलट प्रश्न आणखी मोठा होतो. आवाज किती असावा यावर मतभेद असू शकतात, पण मत मांडण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. गणपतीबाप्पांच्या नावाने उत्सव करायचा आणि शेजाऱ्याच्या कानांचा गणपती करायचा, ही विसंगती कुठेतरी थांबली पाहिजे. आता प्रशासनानेही केवळ आदेश काढण्यापेक्षा नियमांची समान आणि पारदर्शक अंमलबजावणी केली, तरच पुण्याचा उत्सव खऱ्या अर्थाने सार्वजनिक आनंदाचा राहील.
