![]()
काशीच्या विद्वान पंडितांच्या मंत्रघोषात भव्य धार्मिक सोहळा; 1001 औषधी वनस्पतींच्या अभिषेकाने होणार भक्तिमय वातावरण
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ सप्टेंबर २०२६ ।। श्रावणातील शेवटचा सोमवार म्हणजे भक्तीचा जणू अंतिम कळसच! महादेवाच्या नामस्मरणाने वातावरण भारून जाणाऱ्या या पवित्र दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी भव्य महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील एस. के. एफ. कॉलनीतील श्री नागेश्वर शिव मंदिरात हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे.
काशी येथील विद्वान पंडितांच्या पौरोहित्याखाली होणाऱ्या या महारुद्राभिषेकात हिमालयातील 1001 औषधी वनस्पतींचा वापर करण्यात येणार आहे. वैदिक मंत्रांचा निनाद, रुद्राध्यायाचे पठण आणि अभिषेकाच्या पवित्र जलधारेने नागेश्वराचे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. श्रावणाच्या अखेरच्या सोमवारी महादेवाच्या चरणी भक्ती अर्पण करण्याची ही पर्वणी भाविकांसाठी विशेष ठरणार आहे.
दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत महारुद्राभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता महाआरती होईल. महादेवाच्या आरतीनंतर भाविकांसाठी सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाही हा सोहळा अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक विधीबरोबरच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण व्हावे आणि नागरिकांना अध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळावा, हा या आयोजनामागील उद्देश आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांनी भाविकांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “महादेवाच्या भक्तीतून मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. श्रावणातील या पवित्र दिवशी नागेश्वराच्या चरणी सेवा व दर्शनाची संधी पिंपरी-चिंचवडकरांनी घ्यावी,” असे त्यांनी सांगितले.
श्रावण संपतो म्हणून भक्ती संपत नाही; उलट महादेवाच्या नामघोषाने तिची आठवण मनात कायम राहते. त्यामुळे नागेश्वर मंदिरातील हा महारुद्राभिषेक सोहळा भक्तांसाठी श्रावणातील एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.असे मनोगत एस के एफ कॉलनी चे चेअरमन कन्नदासन यांनी व्यक्त केले
