मी लवकरच परत येईन! ट्रम्प यांचा रुग्णालयातून व्हिडिओ संदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ ऑक्टोबर – वॉशिंग्टन -करोनाची बाधा झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅरिलँड येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. करोनावर मात करून मी लवकरच परतणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एक महिन्याचा कालावधी उरला असताना ट्रम्प यांना करोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यातच त्यांच्या प्रकृतीबाबतही चर्चा सुरू होत्या. आता मात्र, ट्रम्प यांनी स्वत: व्हिडिओ जारी केला आहे. ज्यावेळी रुग्णालयात दाखल केले तेव्हा प्रकृती ठिक नव्हती. आता मात्र आराम वाटत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा चांगला परिणाम जाणवत आहे. देवाने केलेल्या चमत्कारासारखीच ही औषधे असल्याचे त्यांनी म्हटले. येणारे काही दिवस प्रकृतीच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माझ्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. आपणा सर्वांना अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी लवकरच पुन्हा परतणार असून निवडणुकीचा प्रचार पूर्ण करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी म्हटले की, लाखोजणांना करोनाची बाधा झाली आहे. सर्वच बाधित करोनाशी दोन हात करत आहेत. करोना फक्त अमेरिकेत नसून संपूर्ण जगात फैलावला आहे. मी संपूर्ण जगातील करोनाबाधितांसाठी लढत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. सध्या मला देण्यात येणारी औषधे एखाद्या चमत्कारापेक्षाही कमी नाहीत. अनेकजण माझ्यावर टीका करतात. मात्र, खरंच हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे त्यांनी सांगितले. फर्स्ट लेडी मेलेनिआ ट्रम्प यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने मास्कचा वापर करण्यास नकार दिला होता. इतकंच नव्हे तर करोना महासाथीच्या आजाराची तीव्रता ठाऊक असूनदेखील त्यांना परिस्थिती हाताळता आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. बायडन मास्कचा वापर करत असल्यामुळे ट्रम्प यांनी त्यांची थट्टा उडवली होती. ट्रम्प हे करोनाबाबतच्या उपाययोजना आखण्यात उदासीन असल्याची टीका करण्यात येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *