![]()
सद्गुरूंचा संदेश स्पष्ट; ब्रह्मज्ञानाची जागृती आचरणातूनच सिद्ध!
महाराष्ट्र 24 – पिंपरी, २४ ऑक्टोबर २०२६ : भक्ती केवळ ओठांवर, सेवा केवळ प्रदर्शनात आणि अध्यात्म केवळ गर्दीत असेल, तर त्या सगळ्याचा उपयोग काय? परमात्म्याचे नाव घेणारे हात माणसाच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाहीत, तर भक्तीचा डंका पिटण्यात अर्थ तरी काय? असाच प्रेम, समर्पण, मानवता आणि आत्मजागृतीचा मोलाचा संदेश देत ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा पहिला दिवस समालखा, हरियाणा येथील निरंकारी आध्यात्मिक स्थळावर भक्तिभावात न्हाऊन निघाला. देशविदेशांतून आलेल्या लाखो श्रद्धाळूंच्या उपस्थितीत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी प्रेम आणि मानवी एकतेचा विचार प्रभावीपणे मांडला.

सद्गुरू माताजींच्या प्रवचनाचा गाभा स्पष्ट होता—ब्रह्मज्ञान म्हणजे जागृतीचा शेवट नव्हे, तर नव्या जीवनाची सुरुवात! सत्संगात बसून डोळे मिटणे सोपे; पण सत्संगातून बाहेर पडल्यावर अहंकाराला आवर घालणे, निंदेपासून दूर राहणे आणि माणसामाणसांत प्रेम निर्माण करणे, ही खरी कसोटी आहे. भक्तीची परीक्षा टाळ्यांच्या गजरात नव्हे, तर रोजच्या वागण्यात होते. वाणी गोड, कर्म निर्मळ आणि मन नम्र असेल, तरच आध्यात्मिकतेचा सुगंध जीवनात दरवळतो, हा संदेश त्यांनी दिला.
परमात्म्याने दिलेली साधने स्वतःपुरती राखण्यापेक्षा ती मानवसेवा आणि परोपकारासाठी वापरावीत, असे आवाहनही माताजींनी केले. सुख असो वा संकट, मनःशांती, विश्वास आणि सहजता ढळू देऊ नये. सेवा, सुमिरन आणि सत्संग यांचा धागा घट्ट पकडून जीवन प्रेम, शांती आणि भक्तीने उजळावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
सेवादलाचा शिस्तबद्ध जागर; सेवाभावाचा प्रभावी हुंकार!
समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भव्य सेवादल रॅलीने झाली. भारतातील विविध राज्यांसह विदेशातून आलेल्या हजारो सेवादल बंधू-भगिनींनी शारीरिक व्यायाम, क्रीडा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि लघुनाटिकांतून शिस्त, सहकार्य व निःस्वार्थ सेवेचे दर्शन घडवले.
सद्गुरू माताजींनी श्वेत ध्वजाचे ध्वजारोहण करून शांती आणि एकत्वाचा संदेश दिला. सेवा म्हणजे केवळ कर्तव्याची नोंद नव्हे, तर मानवतेसाठी सदैव तत्पर राहण्याची जीवननिष्ठा, असे त्यांनी स्पष्ट केले. तन, मन आणि धन परोपकारासाठी समर्पित करण्याचे आवाहनही केले.
संत निरंकारी सेवादलाचे मुख्य संचालक एस. के. जुनेजा यांनी जगभरातून आलेल्या स्वयंसेवकांच्या वतीने सद्गुरू माताजींप्रती श्रद्धा व्यक्त केली.
विविध भाषा, संस्कृती आणि पार्श्वभूमींच्या लोकांना एकत्र आणणाऱ्या या समागमाने एकच विचार अधोरेखित केला—माणसाला माणूस म्हणून जपणे, हीच भक्तीची खरी ओळख; आणि मानवतेची सेवा, हाच अध्यात्माचा खरा कस!